नववर्षाला साईबाबांच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी

साईंबाबांच्या शिर्डीत नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात आले आहे. मंदिराच्या दर्शनरांगांसह साई मंदिर परिसरात भाविकांनी गर्दी केली होती. मध्यरात्री बारा वाजताच साईभक्तांनी एकच जल्लोष करत साईनामाच्या जयघोषाने नवीन वर्षाचे स्वागत केले.

नवीन वर्षाचे स्वागत साईदरबारी करता यावे म्हणून लाखो साईभक्त शिर्डीत दाखल झाले आहे. देश विदेशातून आलेल्या साईभक्तांच्या गर्दीने मंदिर परिसर फुलून गेला होता. मध्यरात्री बारा वाजता फटाक्यांची आतिषबाजी आणि वाद्याच्या तालावर नृत्य करत साईभक्तांनी मोठ्या जल्लोषात नवीन वर्षाचे स्वागत केले. कोरोना संकटानंतर दोन वर्षांनी साई दरबारी नवीन वर्षाची सुरुवात करताना साईभक्तांचा आनंद ओसंडून वाहत होता. तर साई संस्थानकडून भाविकांच्या सुविधेसाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या होत्या.