माझी पत्रकारिता

>> शिरीष कणेकर

बसमध्ये शिरावं तसा मी पत्रकारितेत शिरलो आणि बसमधून बाहेर पडावं तसा मी पत्रकारितेतून बाहेर पडलो. नो रिग्रेटस् – ना खंत ना खेद. म्हणूनच मी माझा पत्रकार असा उल्लेख वाचतो, ऐकतो तेव्हा मला हिणवल्यासारखं वाटतं. मी खजील होतो. जॉय मुखर्जीला नट म्हटल्यावर असंच वाटत असेल का?

पत्रकारितेत येण्यापूर्वी माझ्या मनात पत्रकारितेविषयी गोड कल्पना होत्या. बासुंदी व जिलबीपेक्षाही गोड. प्राजक्ता माळी व संस्कृती बालगुडेपेक्षाही गोड. (अचपल मन माझे नावरे आवरेना!) म्हणजे कसं ते बघा. एका पापभिरू सज्जन माणसावर अन्याय झालेला असतो. (तो पापभिरू व सज्जन आहे हे मला आपसूक कळलेलं असतं. अन्याय म्हणजे नक्की काय हे जाणून घेण्याची मला गरज नसते. अन्याय म्हणजे अन्याय.) मी त्याला भेटायला जातो. तो मनाने कोलमडून गेलेला असतो. त्याची अतिसुंदर, तरुण, कोमल मुलगी भरल्या डोळय़ांनी बघत असते.  मी तिला डोळय़ांनीच दिलासा देतो. (पार्श्वभूमीवर माझ्या मनात ‘मिलतेही आँखे दिल हुआ दिवाना किसीका’ वाजत असते) मी विलंब न लावता त्या सज्जन माणसावरील अन्याय दूर करतो. (कसा दूर करतो काय विचारता? मला अन्याय कुठे माहित्येय?) त्याच्या मनाला उभारी येते. तो माझे दोन हात हातात घेऊन माझे परत परत आभार मानतो. पापण्यांवर अश्रू तोलत ती अतिसुंदर, तरुण, कोमल मुलगी दारापर्यंत मला सोडायला येते. ‘पुन्हा याल ना?’ ती डोळय़ांनी मला विचारते. ‘हो’, मी डोळय़ांनीच उत्तर देतो.

माझ्या ओढाळ मनात पत्रकारिता व प्रेमरज्जूंचं विणकाम एकत्रच सुरू होतात. प्रत्यक्षात मी अख्ख्या पत्रकारी जीवनात कोणावरचाही ज्ञात किंवा अज्ञात अन्याय दूर केला नाही व पापण्यांवर अश्रू तोलणारी एकही अतिसुंदर, तरुण, कोमल मुलगी मला भेटली नाही. ती भेटलीच नाही तर पुढलं डोळय़ांचं संभाषण कसं होणार? जळली ती शिंची पत्रकारिता…

एक आकर्षक सिंधी मुलगी (ते अतिसुंदर, तरुण, कोमल मुलीचं स्वप्न मागेच भंग पावलं होतं.) आमच्याकडे शिकाऊ पत्रकार म्हणून आली होती. मंत्रालयातील एका ‘प्रेस कॉन्फरन्स’ला तिला माझ्याबरोबर पाठविण्यात आलं. तिनं माझ्यापासून शिकावं अशी अपेक्षा होती. तिथं चाललेलं मला काही कळत नव्हतं, पण तिच्यावर इंप्रेशन मारण्यासाठी मी अर्थपूर्ण चेहरा करून बसलो होतो. ‘तू लिही’. ऑफिसात पोहोचल्यावर मी तिला फर्मावले. तिला जमेना. ती सारखे सारखे मला प्रश्न विचारत होती. मलाही काही कळलेले नाही हे त्यातून तिला कळले. मी काय बोडक्याचं इंप्रेशन पाडणार? गेली चाळीस वर्षे मी सिंधी  कॉलनीत राहत असल्याने मला ‘प्रेस कॉन्फरन्स’वाला सिंधी फजितवडा वारंवार आठवतो.

आमच्या प्रेस पार्टीनं एकदा पैठणच्या खुल्या तुरुंगाला भेट दिली. आम्ही मुक्काम संभाजीनगरच्या सरकारी विश्रामगृहात ठेवला होता. (तिथं जांभळाचं आइस्क्रीम मिळू शकलं नाही म्हणून ‘फ्री प्रेस जर्नल’चा भाल्या मराठे रुसला व पैठणला आलाच नाही.) खुला तुरुंग ही कल्पनाच मला नवीन होती. कैद्यांनी खूप वर्षे तुरुंगात काढल्यानंतर ते एकदमच सुधारलेत व पळून जाणाऱ्यातले राहिलेले नाहीत अशी खात्री झालेल्यांना खुल्या तुरुंगात ठेवतात. आमच्या रंजनासाठी कैद्यांनी संगीतमय कार्यक्रम सादर केला. त्यांच्यात एक चाळीस-पंचेचाळीस वर्षांचा नाजूक पोरगेलासा दातार नावाचा माणूस होता. त्यानं अप्रतिम व्हायोलिन वाजवलं. म्हटलं याचीच मुलाखत घ्यावी. कार्यक्रमानंतर मी त्याला एका झाडाखाली घेऊन बसलो.

‘कुठल्या गुन्ह्यामुळे तुम्ही इथे आलात?’ हाताली वही सांभाळत मी त्याला मुलाखतीतला पहिला प्रश्न विचारला

‘खून’ तो शांतपणे म्हणाला.

माझी मुलाखत संपली. असा मी पुचाट. त्यानं भले खून केला असेल पण मला त्याच्यापासून काय भीती हाती? थोडय़ा वेळापूर्वी मला तो खुला तुरुंग राहायला मस्त वाटला होता पण मला व्हायोलिन कुठे वाजवता येत होतं?

मराठी शाळेतून शिकलेल्या आमच्यासारख्यांसाठी इंग्लिशमधून लिहिण्याचं कायमच एक दडपण असायचं. तसा मी व्यवस्थित लिहायचो, पण आत्मविश्वासात मार खायचो. एखाद्या उपसंपादकाने एखाद्या शब्दाला किंवा वाक्यरचनेला हरकत घेतली तर ‘xx तू नको शिकवूस मला’ असं ठणकावून सांगण्याची छाती नव्हती. शेवटी काशीकर सरांच्या इंग्लिशला टेकून मी उभा होतो. आमचा चीफ रिपोर्टर बी.एस.व्ही. राव टाइमपास म्हणून फावल्या वेळात आम्ही दिलेल्या बातम्यांच्या कॉपीजची फाइल चाळत बसायचा. आम्ही डोळय़ांच्या कोपऱयातून धास्तावून बघायचो. आता कोणाची चूक सापडणार व कुणाची हजामपट्टी होणार? एखादं सावज सापडलं व त्याची सालटी सोलली जाऊ लागली की उरलेले आपण बहिरे व आंधळे असल्यागत बसून असत. आज आपण सुपात असलो तरी उद्या आपणही जात्यात भरडले जाणार आहोत याची आमच्यातल्या प्रत्येकाला जाणीव होती.

राव एकदा मला म्हणाला, ‘कणेकर के बच्चे, यू राइट मराठी  इंग्लिश.’

‘नॉट मराठी इंग्लिश रावसाब’ मी म्हणालो. ‘मराठी इंग्लिश असतं तर ते तामीळ, गुजराती, मल्याळी, ख्रिश्चन सब-एडिटर्सनं कसं पास केलं असतं?

मी उलटून बोलण्याचं धारिष्टय़ दाखवतोय याचंच रावला आधी आश्चर्य वाटलं व मग तो कौतुकानं म्हणाला, ‘छोकरा, पॉइंट का बात करता है रे!’

एक पत्रकार (कै.) अशोक जैन काही वेळ स्थिर नजरेनं माझ्याकडे बघत राहिला व मग म्हणाला, ‘तुम्हाला इंग्रजीतून लिहिताही येतं या पलीकडे तुम्हाला काय अक्कल आहे रे?’

त्यानं इंग्रजी पत्रकाराला शुद्ध मराठीतून सत्य सांगितलं होतं.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या