झोपू द्या ना जरा…

1498

>> शिरीष कणेकर

नवरात्र संपले दसरा उजाडला. मोरूचा बाप मोरूला म्हणाला, ‘‘उठा, ऐतखाऊ युवराज. आता जेवण्यासाठी तरी तुला उठावंच लागेल.’’
‘‘असंच काही नाही’’ भलीमोठी जांभई देत व कूस बदलत मोरू म्हणाला, ‘‘तुम्ही पलंगाशेजारी वाढलेलं ताट आणून स्टुलावर ठेवा. मी पडल्या पडल्या जेवीन. पाणी नंतर आणून दिलेत तरी चालेल.’’
‘‘तुला कसली लाज म्हणून नाही,’’
‘‘आजी म्हणते बापावर गेलास.’’
‘‘म्हणजे मी निर्लज्ज आहे.’’
‘‘मी नाही म्हणत, आजी म्हणते. ती तुम्हाला जन्मापासून ओळखते.’’
‘‘जेवल्यावर तरी तू हात व तोंड धुवायला उठणार आहेस की मी इथेच पलंगाजवळ वाडगा, त्यात कोमट पाणी व लिंबू आणून देऊ?’’
‘‘दॅटस् बेटर.’’ मोरू आळसावून म्हणाला, ‘यालाच पुत्रसेवा म्हणतात. अहो, लोक इथं पुतण्याचीदेखील सेवा करतात, मी तर तुमचा सख्खा मुलगा आहे. तुम्ही मुलायम मी अखिलेश, तुम्ही चिदंबरम मी कार्ती, तुम्ही सचिन तेंडुलकर मी अर्जुन, तुम्ही डेव्हिड धवन मी वरुण, तुम्ही विजयपथ सिंघानिया मी गौतम, तुम्ही महेश कोठारे मी आदिनाथ, तुम्ही छगन भुजबळ मी पंकज.
‘‘यातला कुठला मुलगा बाप उठवायला आला तरी दुपारी बारा-बारा वाजेपर्यंत झोपून राहतो? तेही दसऱयाच्या दिवशी?’’
‘‘मगाशी तुम्ही जेवून हात व तोंड धुण्याचं बोललात. वाघ-सिंह कधी हात धुतात का? तोंड विसळतात का?’’
‘‘पण ते स्वतः शिकार करून खातात, बाप जेवण आणून द्यायची वाट बघत नाहीत.’’
‘‘फार टेक्निकॅलिटीज’मध्ये जाता बाबा तुम्ही. आपल्या दोघातल्या कोणीही अन्न आणलं तरी आणणारा वाघच असणार आहे, काय?’’
‘‘तुझी ही हुशारी अभ्यासात का नाही दिसत?’’
‘‘मी माझी हुशारी कुठं दाखवायची हे ठरविण्याचा अधिकारही मला नाही का? का तुम्ही सगळे मिळून माझा छळ करता? कधी कधी मला वाटतं की, तुम्ही हिटलर आहात व मी तुमच्या छळवणूक केंद्रात आहे. आई काय म्हणते?’’
‘‘आई म्हणते की, त्याच्या कंबरडय़ात लाथ घाला.’’
‘‘बघितलंत? बघितलंत? तुमच्या सहवासात राहून आईही अत्याचारी व हिंसाचारी होत चालल्येय. कसं होणार या देशाचं? तुम्हाला आजोबांनी वेळीच चेचलं असतं तर तुम्ही हिटलर झाला नसतात.’’
‘‘मी हिटलर आणि तू कोण नेल्सन मंडेला की अण्णा हजारे?’’
‘‘त्या दोघांचेही वडील हिटलर नव्हते. ते माझ्याच नशिबी आलेत. आजी तुम्हाला ‘कुऱहाडीचा दांडा’, ‘कर्दनकाळ’, ‘साप’ आणि काय काय म्हणते’’
‘‘आजी आणि मी दोघंही आता भूतकाळ आहोत. तो उकरत बसू नकोस. तू वर्तमान आहेस. त्याविषयी बोल.’’
‘भूतकाळ कधी वर्तमानाविषयी बोलत नसतो. मात्र वर्तमानानं भूतकाळाविषयी बोलावं हा त्याचा जन्मसिद्ध हक्क आहे. शिवाय तसा रिवाजही आहे. थांबा, आजीला बोलावतो.’
‘‘नको, ती आजोबांची चंपी करत्येय. आजोबा या खोलीतून त्या खोलीत पळतायत.’’
‘‘तुम्हीच बघा. तुमची ही अवस्था झाली नाही. कारण मी तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. गेल्या रविवारी तुम्ही कच्च मटणच खात होतात. आईनं तुम्हाला लाटणं फेकून मारलं तेव्हा कोण मध्ये आलं होतं? तुमच्याकडे औषधालाही कृतज्ञता नाही. भाजी आणायला दिलेल्या पैशांतून तुम्ही कोपऱयावरच्या ‘डॉम्निक लिकर बार’ मधून ठर्रा मारून आलात तेव्हा तुम्हाला आधी पलंगाखाली व मग कपाटात कोणी लपवलं होतं जरा आठवा. कपाटात घाण वास येत होता एवढंच तुम्ही बोललात (तो वास तुमचाच होता), पण आपल्याला जीवदान देणाऱ्या माझ्याविषयी दोन गोड शब्द तुमच्या तोंडातून निघाले नाहीत. तुम्हाला आजीनंच खरं ओळखलंय, त्यानंतर आईने.’’
‘‘तू उठणार आहेस का?’’
‘‘आई लाटणं घेऊन मारायला आलीय वाटतं?’’
‘‘हो. पण तुला. मी तुला वाचवायला आलोय.’’
‘‘शाबास रे पठ्ठे. तुम्ही आणि मी म्हणजे ढाण्या वाघ व त्याचा बछडा, वनकेसरी सिंह व त्याचा छावा, विजय मांजरेकर व संजय मांजरेकर, राजीव गांधी व राहुल गांधी, ‘गॉड मॅन’ आसारामबापू व नारायण साई.’’
‘‘माझ्यावर दया कर व तुझी आई येण्यापूर्वी आता ऊठ.’’
‘‘तुम्हाला इथं पाहिल्यावर तुमच्यावरच हल्ला करण्याची उर्मी आईच्या मनात दाटून येणार नाही कशावरून?’’
‘‘खरं आहे, बाजूला सरक. मला झोपायला जागा दे. ती झोपलेल्याला मारणार नाही.’’

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या