Ind Vs Eng Test Match – अब आयेगा मजा…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शिरीष कणेकर

अश्विन-अश्विन पुकारू मैं इंग्लंड में
मोरा अश्विन बैठा पॅव्हेलियन में

आज मँचेस्टरला सुरू होणाऱया पाचव्या व अंतिम सामन्यात तरी हिंदुस्थानातील (व जगातीलसुद्धा) सर्वोत्कृष्ट ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन याची वर्णी लागणार का? शक्यता दिसत नाही. अश्विनच्या संदर्भात ‘वर्णी’ शब्द वापरावा लागतोय यात सगळं आलं. यापूर्वी दौऱयावर जाणाऱया कुठल्याही संघाचा प्रमुख फिरकी गोलंदाज मालिकेतील एकाही सामन्यात खेळवला गेलेला नाही असं घडलेलं नाही. हा विचित्र विक्रम आपल्या नावावर लागणार आहे. अश्विनविना दोन सामने आपण जिंकून दाखवले. हा भीमपराक्रम खराच, पण त्यामुळे अश्विनला सातत्यानं संघाबाहेर ठेवणे समर्थनीय ठरत नाही.

अश्विननं विकेटस् काढल्या असत्या, नसत्याही. तो मुद्दाच नाही. आपला सर्वोत्तम गोलंदाज खेळवायचाच नाही हे धोरण कसं असू शकतं? बरं, दोन सामन्यांत तो चालला नाही असंही नाही. चालायला किंवा न चालायला त्याला मुळात खेळवायला नको का? त्याला संघात स्थान देणं हे अक्षर पटेल किंवा वॉशिंग्टन सुंदर या नवशिक्यांवर भिस्त ठेवण्याइतके ‘रिस्की’ कसं म्हणता येईल? अश्विनला वगळणे यामागे संघ निवड समितीचं (म्हणजे शास्त्र्ााr व कोहली हे दोघेच ना? उपकर्णधार अजिंक्य रहाणे याचं मत विचारात घेत असतील तर ते तो स्वतःला देत असावा) काय धोरण असू शकेल? तुमच्या माऱयात विविधता नको? चार वेगवान गोलंदाजांपेक्षा तीन वेगवान गोलंदाज व एक (जागतिक कीर्तीचा) फिरकी गोलंदाज हा मारा अधिक भेदक वाटत नाही का?

ओव्हलच्या विकेटवर पाचव्या दिवशी जडेजाचे चेंडूही वळत व उसळत होते. त्यातल्या एकावर त्यानं सलामीवीर हसीब हमीदचा त्रिफळा उडवला व मोईन अलीला भोपळा फोडण्यापूर्वी शॉर्टलेगला बदली क्षेत्ररक्षक सूर्यकुमार यादवकडे झेल द्यायला भाग पाडले. डावऱया फलंदाजांविरुद्ध अश्विननं मिळवलेलं यश वारंवार समालोचनात सांगितलं जात होतं. हसीब हमीद, मोईन अली व मलान हे तीन डावरे फलंदाज इंग्लिश संघात होते (तरी करण नव्हता), पण पॅव्हेलियनमध्ये बसून अश्विन या डावखोऱयांना कसं नाचवणार होता?

शार्दुल ठाकूर व उमेश यादव यांनी उज्ज्वल कामगिरी करून संघातील आपलं स्थान बळकट केलंय. जडेजाची उपयुक्तता सगळय़ांनाच पटल्येय. मग अश्विनला संघात घुसवायचं(!) कोणाच्या जागी? आपल्यापुढेही हीच समस्या असल्यासारखं कोहली भासवतोय. अश्विन संघाचा अविभाज्य भाग आहे हे आपल्याला कळतं तसं कोहलीला कळत नाही का? नक्कीच कळतं, पण मग तरीही तो असा आडमुठेपणे का वागतोय? मग डोक्यात किडा वळवळायला लागतो की, प्रकारात क्रिकेटबाहेरची काही गोष्ट तर नाही? कोहली आणि अश्विनची काही वादावादी तर झाली नसेल? अश्विन कोहलीला काही लागेलसं तर बोलला नसेल? काय माहीत! कळायला मार्ग नाही. ही शंका अधिक न ताणता इथेच सोडून देऊ द्या.

ओव्हलवर पंत जबाबदारीनं खेळल्यामुळे त्याचे विकेटकीपिंग ग्लोव्हज् राहुलकडे सोपवून संघात (अश्विनसाठी?) जागा निर्माण करण्याची कल्पनाही आता बाद झाल्येय. कोणीतरी नवीन पिलू सोडलंय. रहाणेच्या जागी अश्विनला का खेळवू नये? पहिली गोष्ट म्हणजे अश्विनला संघात खेळवण्यासाठी कोहली तडफडतोय असं आपण अकारण गृहीत धरतोय. वस्तुस्थिती अगदीच वेगळी आहे. बरं, फलंदाजाच्या जागी गोलंदाज? रहाणे फलंदाज म्हणून कितीही निराशा करीत असला (ते एकदाचे 61 विसरा!) तरी उपकर्णधाराला संघातून डच्चू देणं सोपं नाही. त्यातून दिलाच तर त्याच्या जागी मयंक अगरवाल किंवा सूर्यकुमार यादव यांना घ्यावं लागेल. फलंदाजाच्या जागी फलंदाज. सिराजच्या जागी तंदुरुस्त झालेला शमी येऊ शकेल. अश्विन पुन्हा बाहेरच. संघात स्थान मिळविण्यासाठी कर्तृत्व तर लागतंच, पण कर्णधाराची मर्जीदेखील लागते. इथे अश्विन मार खातोय. ‘सुसरीबाई, तुझी पाठ मऊ’ अशा अर्थाची म्हण अश्विनच्या मातृभाषेत नाही का?

रवी शास्त्र्ााr व विराट कोहलीच्या सांगण्यावरून असेल किंवा त्यालाच उपरती झाल्यानं असेल, चेतेश्वर पुजारानं कात टाकल्येय. तो बहुधा प्रथमच त्याच्या भात्यातील फटके दाखवतोय. बघायला इतपं छान वाटतंय म्हणून सांगू! ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटात करिना कपूरला कधी नाही ते पूर्णवस्त्र्ाांकित पाहून शाहरुख खान काजोलला म्हणतो, ‘‘अपनी ‘पू’ कपडों में कितनी अच्छी दिखती है ना!’’ कायापालट झालेल्या पुजाराला पाहून असंच म्हणावंसं वाटतं. ‘‘कव्हर ड्राईव्ह व पूल मारताना आपला पुजारा किती छान दिसतो ना!’’ रोहन कन्हाय, नील हार्वे व झहीर अब्बाससारखे संघातील सर्वोत्तम ‘स्ट्रोक प्लेयर्स’ तिसऱया क्रमांकावर फलंदाजीला येत असत हे पुजारानं विसरू नये. त्याला झालेली उपरती दीर्घकाळ टिको ही श्रीचरणी प्रार्थना.

हिंदुस्थानतर्फे आतापर्यंत राहुल व रोहित या दोन सलामीवीरांनीच शतपं झळकवलीत. दोघांनी संघाला बहुतेक वेळा भक्कम, खंबीर सलामी दिल्येय. त्या विकेटस्वर व त्या हवामानात त्यांनी इंग्लंडचा नव्या चेंडूवरील मारा (व अँडरसन) समर्थपणे खेळून काढलाय. त्यांचा भर पूर्णपणे बचावावर होता. त्यामुळे विकेट गेली नाही तरी धावाही फारशा निघाल्या नाहीत. इंग्लिश गोलंदाजांचा वरचष्मा कायम राहिला. मार पडत नसल्यामुळे ते गोलंदाजीत वेगवेगळे प्रयोग करू शकत होते. हीच गोष्ट मला खटकल्येय. त्यांचा बचाव इंग्लंडला नामोहरम करू शकत नव्हता, परंतु राहुल व रोहितचा पवित्रा चुकीचा होता हेही म्हणता येणार नाही. सुरुवातीला विकेट गमावली तर रांग लागेल अशी भीती त्यांना असू शकते. इंग्लंडचं काय झालं? बिनबाद शंभरवरून सर्व बाद 210.

ऑस्ट्रेलियातील आपला हिरो अजिंक्य रहाणे इंग्लंडमध्ये विदूषक ठरतोय. नस्तर एकदा पाठीशी लागलं की लागतंच. अलीकडेच फलंदाजीत सुधारणा केलेल्या जडेजाला रहाणेच्या आधी फलंदाजीला पाठवतायत. निव्वळ फलंदाज म्हणून संघात असलेला रहाणे जडेजाच्या खाली? उद्या तुम्ही त्याला शार्दुलच्याही खाली पाठवाल. मग तो फलंदाज कसा? कुठेही खेळवा, पण संघात ठेवा ही आग्रही मागणी कोणाची? तो संघाचा उपकप्तान असल्यामुळे म्हणा किंवा त्याच्या खाती असलेली पूर्वपुण्याई अजून शिल्लक असल्यामुळे म्हणा किंवा जिंकणाऱया संघात बदल करण्यास कोहली तयार नसल्यामुळे म्हणा, या पाचव्या कसोटीत रहाणे खेळणार हे नक्की, पण या संधीचं त्यानं सोनं केलं नाही, तर त्याचं काही खरं नाही हेही तेवढंच नक्की. पुजारानं कारकीर्दीला मुदतवाढ दिल्येय इकडे रहाणेनं लक्ष द्यावं.

खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे गोलंदाजी न करू शकणारा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंडय़ा संघातून बाहेर आहे. बघता बघता त्याची जागा ठाकूरनं बळकावल्येय. परिश्रमाला पर्याय नाही. ओव्हलवर ‘मॅन ऑफ द मॅच’ होता होता तो थोडक्यात राहिला. इंग्लंडच्या दुसऱया सलामीला शतकी भागीदारी करणाऱया बर्न्सला त्यानं बाद केले व आपल्या मार्गात सतत अडसर ठरत असलेल्या रूटला त्रिफळाचीत केले. आणखी काय करायला हवं होतं ‘पालघर एक्प्रेस’नं? जोडीला पहिल्या डावात 57 धावा व दुसऱया डावात 60 डावा. उगीच नाही कोहली त्याला मराठीत म्हणाला, ‘‘तुला परत परत मानले रे, ठाकूर!’’

आजचा सामना महत्त्वाचा आहे. आपण हरलो तर मालिका दोन-दोन अशी बरोबरीत सुटेल. सामना अनिर्णित राहिला तर आपण दोन-एक असे जिंकू आणि आपण जिंकलो तर पहिल्या सामन्यानंतर सुनील गावसकरनं भाकीत केल्याप्रमाणे आपण तीन-एक अशा घसघशीत मार्जिननं जिंकू. तूर्तास ‘वी सिट विथ अवर फिंगर्स क्रॉस्ड’ हे मराठीत कसं म्हणतात?