शिरीषायन – कुंचला विरुद्ध लेखणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>शिरीष कणेकर

पुस्तक लिहिणे सोपं आहे, पण त्याच्या बाळंतपणाचे पुढले सोपस्कार करणे महाकठीण आहे. आनंददायी गोष्टीतील हा मनस्ताप, हा त्रास, ही कटकट मूळ आनंदाचाच बीमोड करते. ये क्या माजरा है? – लता मंगेशकरवर येत असलेल्या पन्नासाव्या पुस्तकाच्या संदर्भात माझे हे विचार आहेत.

बरं, लेखकानं त्यात पडायचंच नाही म्हटलं तर ते कसं शक्य आहे? वाचक पुस्तक विषय पाहून व लेखकाचं नाव वाचून घेत असतो; प्रकाशकाचं नाव वाचून नव्हे, सॉरी हं! प्रकाशकांनी रागावू नये. राग तर त्यांच्या नाकाच्या शेंडय़ावर असतो. एखाद्या नाजुक सुंदरीच्या असतो तसा. लेखक पटेपर्यंत प्रकाशक आतुर, उत्सुक व उतावीळ असतात. त्यानंतर लेखक जणू लग्नाची बायको होतात. नो मोअर लाड… लेखक व प्रकाशक हे एकमेकांच्या मेव्हण्यांसारखे असतात. बायको म्हणजे पुस्तक हा त्यांना जोडणारा समान दुवा असतो. पुस्तकागणिक हे मेव्हणे बदलत असतात, पण नातं तेच.

मुखपृष्ठकार व लेखक यांचं नातं सवतीसारखं असतं. दोघींचंही नवऱयावर (इथे पुस्तकावर असे वाचावे.) प्रेम असतं, पण सहसा (अपवाद सांगू नका) त्यांच्यातून विस्तव जात नाही. अलीकडेच मला एक मान्यवर मुखपृष्ठकार चित्रकार उद्विग्नपणे म्हणाला, ‘गेली कित्येक वर्षे मला एक गोष्ट कळूच शकलेली नाही. हे लेखक एका दृष्टिक्षेपात ‘कव्हर’ कसे नाकारतात?’ एका दृष्टिक्षेपात लेखक कव्हर कसे स्वीकारतात, हा प्रश्न त्याला कसा पडत नाही? अशा प्रसंगी त्याच्या पुंचल्याची जादूच अशी असते की (निर्बुद्ध) लेखकही नागाप्रमाणे डोलायला लागतो.

दुकानात पुस्तक खरेदीसाठी गेलेला सामान्य वाचकही एका नजरेतच मुखपृष्ठ जोखत असतो. वास्तविक त्यानं दुकानदाराला म्हटलं पाहिजे – ‘मला पुस्तक नुसतंच घरी घेऊन जाऊ द्या. आठपंधरा दिवस मी ते समोर टेबलावर मांडून ठेवतो. त्यातली सौंदर्यस्थळे हुडकतो. मग ठरवितो की मला ‘कव्हर’ आवडलं की नाही ते.’ मान्यवर चित्रकार महोदयांना अशी प्रोसेस अपेक्षित आहे काय?

एका प्रतिथयश चित्रकारानं माझ्या लतावरच्या पुस्तकासाठी केलेलं मुखपृष्ठ मला भावलं नाही.

‘आणखी काही आयडिया?’ मी आशाळभूतपणे विचारले,

‘नाही’ तो ठासून म्हणाला.

त्यानंतर ‘कव्हर’साठी त्यानं घेतलेली मेहनत त्यानं मला साद्यंत कळवली. काय गरज होती? तो मेहनत घेणार, प्रयत्नात कसूर करणार नाही हे अध्यारुत होतं. त्यामुळेच त्याचं नाव झालं होतं. तो ढकलपंची काम ठोकून द्यायचा नाही, परंतु त्याची धंदेवाईक ढोर मेहनत चित्रात मला (व प्रकाशकालाही) दिसत नसेल तर? तो पहाटे कसा उठला व त्यानी ताजी प्राजक्ताची (माळीची कोण?) फुलं कशी जमवली, कशी कल्पकतेनं मांडली वगैरे तपशील मला कळवला. त्या नाजुक फुलांचा सुवास लताच्या स्वराचा आभास होता. एवढंच नाही तर त्या फुलांचे देठ लताच्या मूलगामी कट्टर हिंदुत्ववादाचे प्रतीक होते. ऑ? म्हणजे बारीक नजरेनं ते देठ पाहून वाचक म्हणणार, ‘बघितलात का लतांचा हिंदुत्ववाद? ओ हो हो!’

त्याचे ‘कव्हर’ नाकारणे म्हणजे त्याच्या लेखी संगीतकारानं साक्षात लताला, संपादकांनी साक्षात पु. लं.ना व सिलेक्टर्सनी साक्षात ब्रॅडमनला नाकारण्यासारखं होतं. किस खेत की मुली हो तुम? हमे चॅलेंज करते हो?… त्यानं माझ्यावर बहिष्कार टाकला. यापुढे माझ्या कुठल्याही पुस्तकाचं मुखपृष्ठ न करण्याची त्यानं कसम खाल्ली. ‘देखो कसम से, देखो कसम से, कहते है तुमसे हाँ’ हे गाणंही तो गायला असेल.

समजा माझ्या एका मित्राला माझा लेख आवडला नाही (त्याला कुठलेच आवडत नाहीत म्हणा!) तर काय मी त्याच्याशी दोस्ती तोडायची? तुझ्या घरावरूनही जाणार नाही, असे फूत्कार टाकायचे? तो मित्र आहे की स्तुतीपाठक? माझं साहित्य डोक्यावर घेऊन नाचतात तेवढय़ांशीच मी संबंध ठेवणार, अशी मी भूमिका घ्यायची? काय पोरकटपणा चाललाय?

बहुसंख्य चित्रकारांची एक अव्यक्त भूमिका असते. आम्ही प्रशिक्षित आहोत. वी नो अवर जॉब. आमचे चित्र नाकारणारे तुम्ही कोण? कागदावर सरळ रेघ तरी मारता येते का? तेव्हा जे काही आम्ही चितारू ते आहे तसे तुम्ही स्वीकारायलाच हवे. आम्ही सांगतो का तुम्हाला लेख बदलायला…?

हे असंच चालू राहिलं तर चित्रकार झपाटय़ानं आयुष्यातून जात राहतील. पुस्तकांना ब्राऊन कव्हरचे वेष्टण घालून ते बाजारात आणावं लागेल. तसे पाहिले तर चित्रकारांना लेखक कमी पडणार नाहीत. लेखकांना चित्रकार कमी पडणार नाहीत. (खरं म्हणजे चित्रकारांचा तुटवडा जाणवेल.) पण एक छान युती, उत्तम जोडी, मस्त समन्वय लयाला जातील याची खंत कोणी बाळगायची? मला आहे. चित्रकारांना आहे की नाही, त्याचं त्यांना माहीत. ते सर्वाधिक महत्त्व ‘इगो’ला देत असतील तर?

मी आता ऐंशीव्या वर्षी चित्रकला शिकायचं म्हणतोय. सरळ जे. जे. स्कूल ऑफ आर्टलाच जातो. त्यानंतर मी चितारलेलं माझ्या पुस्तकाचं मुखपृष्ठ माझ्यातील लेखकाला तत्काळ व बेहद्द आवडेल… काय?

[email protected]