मिंधे-भाजपने मराठवाड्याच्या अपेक्षांचा खून केला, अंबादास दानवे यांनी डागली तोफ

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आाघाडी सरकारवर टीका केली. मराठवाडय़ाच्या वॉटरग्रीड प्रकल्पाचा आधीच्या सरकारने खून केल्याचा आरोप त्यांनी केला. त्याला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिले. खरं तर कोटय़वधी रुपयांचा खर्च करून घेतलेल्या बैठकीनंतर केलेल्या जुन्याच घोषणांमुळे संपूर्ण मराठवाडय़ातील जनतेच्या आशा, आकांक्षा व अपेक्षांचा खून आज मिंधे सरकारकडून झाला आहे, अशी तोफ दानवे यांनी डागली.

मराठवाडय़ाच्या विकासासाठी महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कामाची पावती ही आपल्याच सरकारकडून मिळालेल्या पत्रातून दिसून येते. ज्या वॉटरग्रीड प्रकल्पाचा उल्लेख आपण केला, त्यासाठी महाविकास आघाडी सरकारने पैठण-ब्रह्मगव्हाण सिंचन आणि गंगापूर-वैजापूर उपसा सिंचन योजनेसाठी मोठय़ा प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला याचा विसर पडला आहे, असे ते म्हणाले.

नुसती घोषणा करायची आणि निघून जायचं; दुष्काळग्रस्तांवर थापांचा पाऊस, मराठवाड्याला मिंध्यांनी गंडवले

मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनानिमित्त 2016 मध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत जवळपास 22 वेगवेगळ्या विकासकामांसाठी जवळपास 40 हजार कोटी रुपयांची घोषणा केली होती. याच बैठकीतील विकासकामांचा उल्लेख आज शनिवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. हे करत असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मराठवाड्याच्या वॉटरग्रीड प्रकल्पाचा खून केल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. मात्र, प्रत्यक्षात आपण कोट्यवधी रुपयांचा खर्च करून घेतलेल्या बैठकीनंतर केलेल्या जुन्या घोषणांमुळे आपण संपूर्ण मराठवाड्यातील जनतेच्या आशा, आकांक्षा व अपेक्षांचा खून केला आहे. मराठवाड्याच्या विकासासाठी ठाकरे सरकारने केलेल्या कामाची पावती ही आपल्याच सरकारकडून मिळालेल्या पत्रातून दिसून येते. ज्या वॉटरग्रीड प्रकल्पाचा उल्लेख आपण केला, त्यासाठी ठाकरे सरकारने पैठण-ब्रह्मगव्हाण सिंचन आणि गंगापूर-वैजापूर उपसा सिंचन योजनेसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला याचा विसर पडला आहे.

मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री पवार अकार्यक्षम आहे का?

मराठवाड्याच्या बैठकीत ठाकरे सरकारविरुद्ध बोलणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघेही सरकारमध्ये होते. ते आता ठाकरे सरकारवर टीका करत असले, तरी मुख्यमंत्री हे पहिल्या फळीचे मंत्री तर अजित पवार हे अर्थमंत्री होते. मग आपण हे दोघेही अकार्यक्षम मंत्री आहेत, हे सांगायला हवे. हे दोघही जबाबदार आहे, हे सांगायला हवे.

शेतकर्‍यांच्या आत्महत्यांबाबत संवेदनाशून्य

राज्यात वर्षभरात जवळपास 1300 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. यापैकी मराठवाड्यात 785 शेतकर्‍यांच्या आत्महत्या झाल्या. याबाबत संवेदनाशून्य सरकारने काय उपाययोजना केली? शेतकर्‍यांच्या विकासासाठी आत्महत्या थांबविण्यासाठी ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळे हे सरकार शेतकरी कष्टकर्‍यांबाबत संवेदनाशून्य असल्याचे बैठकीतील निर्णयानुसार दिसून येते, असेही विरोधी पक्षनेते दानवे म्हणाले.