
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त शिवसेना, युवासेनेसह विविध संघटनांनी सामाजिक उपक्रमांतून त्यांना आदरांजली वाहिली. त्यानुसार रक्तदान शिबीर, कोरोना लसीकरण, वृक्षारोपण अशा कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
शिवसेना शाखा क्रमांक 90 कालिना येथे विभागप्रमुख आमदार संजय पोतनीस यांनी सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत प्रत्येकी पाच हजार रुपये भरलेल्या पासबुकचे वाटप केले. तसेच शाखा क्रमांक 91 च्या वतीने वाकोला येथे लसीकरणाविषयीच्या मोफत युनिर्व्हसल पाससाठी नोंदणी सुरू केली. याप्रसंगी विभाग संघटक संजना मुणगेकर, नगरसेवक दिनेश कुबल, उपविभागप्रमुख बळीराम घाग, महिला संघटक हर्षदा परब, उपविभाग संघटक साधना डाळ, शाखाप्रमुख शोमन तेंडोलकर, गणेश सावंत, राजू नाईक, शाखा संघटक पूजा राऊळ आदी उपस्थित होते.
शिवसेना नेते दिवाकर रावते, खासदार राहुल शेवाळे, उपनेत्या विशाखा राऊत, विभागप्रमुख-आमदार सदा सरवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागप्रमुख यशवंत विचले यांच्या संकल्पनेतून शिवसेना भवनाजवळ शिवसेना सचिव-खासदार अनिल देसाई यांच्या हस्ते चाफा या वृक्षाचे रोपण करण्यात आले. या वेळी न्यू इंडिया इन्शुरन्सच्या स्थानीय लोकाधिकार समितीचे सचिव दिनेश बोभाटे, खजिनदार प्रवीण पंडित आदी उपस्थित होते.
भारतीय कामगार सेना विमानतळ विभागाच्या वतीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहण्यात आली. परिवहन मंत्री अॅड. अनिल परब, भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस सचिन अहिर, युवासेना सचिव वरुण सरदेसाई, भारतीय कामगार सेनेचे चिटणीस मनोज धुमाळ, जितेंद्र जानावळे, उपविभाग प्रमुख समीर साबे, माजी नगरसेवक सुभाष कांता सावंत यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. सदर कार्यक्रमाचे आयोजन भारतीय कामगार सेनेचे चिटणीस संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली केले होते. यावेळी भारतीय कामगार सेनेचे चिटणीस संतोष कदम, सहचिटणीस सूर्यकांत पाटील, राजा ठाणगे आदी उपस्थित होते.



























































