17 नोव्हेंबर शिवसेनाप्रमुखांचा स्मृतिदिन; गर्दी करू नका, संयम पाळा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या महानिर्वाणदिनी येत्या 17 नोव्हेंबरला त्यांना आदरांजली वाहण्यासाठी शिवतीर्थावर गर्दी करू नये, संयम पाळावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी येथे केले.

मराठी माणसांत स्वाभिमानाचा अंगार फुलवून त्याला सामर्थ्यशाली बनवणाऱ्या शिवसेनाप्रमुखांना मानवंदना देण्यासाठी महाराष्ट्रासह देशभरातून असंख्य हिंदू, शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमींचा अलोट जनसागर 17 नोव्हेंबरला शिवतीर्थावर उसळतो. मात्र सध्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गर्दी करू नये, असे आवाहन करताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘शिवसेनाप्रमुखांचा स्मृतिदिन आहे. तुमच्या भावना आणि श्रद्धा मी समजू शकतो. पण या वेळेस संयम पाळावा लागेल. कुणीही गर्दी करू नये. शिवसेनाप्रमुखांचे तुम्हा सर्वांच्या हृदयातील स्थान मला ठाऊक आहे. शिवतीर्थावरील शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिस्थळावर येऊन त्यांना मानवंदना द्यावी ही प्रत्येकाचीच भावना आहे. पण माझी तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती आहे… तुम्ही जेथे आहात तेथूनच शिवसेनाप्रमुखांना मानवंदना द्या. शिस्त आणि नियमांचे पालन करा, हीच त्या दिवशी शिवसेनाप्रमुखांना खरी आदरांजली ठरेल!’