नाणार रद्द करण्याचे निवेदन करा, शिवसेनेची आग्रही मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

प्रदूषणकारी नाणार प्रकल्पामुळे येथील शेतकरी तसेच बागायतदारांवर उपासमारीची वेळ येणार आहे. प्रदूषणामुळे राजापूर, देवगडमधील पर्यावरणालाच धोका निर्माण होणार असल्याने हा प्रकल्प रद्द करण्यात यावा, अशी शिवसेनेची आग्रही मागणी आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी या प्रकल्पासाठी भूमिअधिग्रहणाची काढण्यात आलेली नोटीस रद्द करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. मुख्यमंत्र्यांनी नाणारवासीयांना प्रकल्प लादणार नाही असे आश्वासन दिले. मात्र त्यानंतरही कार्यवाही झालेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प रद्द करण्याचे निवेदन सभागृहात करून नाणारसह कोकण भकास होण्यापासून वाचवावे, अशी मागणी शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी केली.

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी एप्रिल 2018 अंतर्गत काढलेला अध्यादेश रद्द करण्यासाठी जी फाइल उच्चस्तरीय समितीकडे देण्यात आली होती तो अध्यादेश अद्यापपर्यंत रद्द झालेला नाही. सरकारने अध्यादेश रद्द कधी होणार याविषयीचे निवेदन करावे जेणेकरून नाणारवासीयांवर टांगती तलवार राहणार नाही, अशी मागणी प्रभू यांनी केली.