शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा ‘इशारा मोर्चा’, उद्धव ठाकरे यांची गर्जना

22


सामना ऑनलाईन । मुंबई

शेतकऱ्यांना नडाल तर शिवसेना आपल्या स्टाईलने उत्तर देईल असा इशारा देण्यासाठी 17 जुलै रोजी मुंबई पीक विमा कंपन्यांच्या विरोधात ‘इशारा मोर्चा’ काढण्यात येणार असल्याची गर्जना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेच, पण शिवसेना शेतकऱ्यांच्या सोबत आहे. म्हणूनच मुंबईत होणारा मोर्चा पीक विमा कंपन्याचा विरोधातील शेतकऱ्यांचा नाही तर शेतकऱ्यांसाठीचा मोर्चा असेल असे उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शिवसेना सातत्याने काम करत आहे. दुष्काळग्रस्त भागात चाराछावण्यांना प्रसाद, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत सुरू आहेच. त्याच बरोबर शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ त्यांना व्हावा यासाठी शिवसेना कायम प्रयत्नशील आहे. पीक विमा योजनेसंदर्भात शिवसेनेने अशीच ठाम भूमिका घेतली आहे. सरकार बदलल्यानंतर कर्जमाफी योजना, पंतप्रधान पीक विमा योजना या चांगल्या योजना सुरू करण्यात आल्या असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांनी योजनांचे कौतुक केले. मात्र सरकार बदलले असले तरी यंत्रणामात्र तीच आहे. या यंत्रणेला जागं करावं लागतं. म्हणून आम्ही शेतकऱ्यांसाठी मुंबईत हा इशारा मोर्चा काढणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांना नडाल तर कंपन्यांचे ऑफिस मुंबईत आहे असा इशारा दिल्यानंतर संभाजीनगर, मराठवाडा, बुलढाणा येथे अनेक शेतकऱ्यांना त्यांचे पैसे मिळण्यास सुरुवात झाल्याचे समोर आले. मात्र अजूनही अनेकांना हे पैसे मिळालेले नाहीत. त्यांच्यासाठी शिवसेनेने मदत केंद्रे उभारली आहेत. त्यात अनेकांनी अर्ज केले आहेत. अर्ज अजुनही साठले आहेत. त्यामुळे येत्या 17 तारखेला एक मोर्चा विमा कंपन्यांवर धडकणार आहे. मुंबईतला मोर्चा हा प्रातिनिधिक स्वरुपातील असेल. मात्र इतर कंपन्यांकडे आमची शिष्टमंडळे जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारी पातळीवरही आमचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांनी देखील सरकारी अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. आम्ही देखील आपल्यापरीने प्रयत्न करत आहोत. पीक विमा देणाऱ्या कंपन्यांना आम्ही ही प्रेमाची सूचना करत आहोत, असंही ते म्हणाले.

बँकांकडे सुद्धा आम्ही मागणी केली आहे की, गावामध्ये कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या दारावर नोटीस लावते आणि मग लाजेखातर आत्महत्या होते. त्यामुळे ज्या बँकांनी कर्ज वाटली, किती जणांना कर्जमाफी दिली त्याची माहिती बँकेच्या बाहेर लावावी, असेही त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या