मनामनात शिवसेना! आज 54 वा वर्धापनदिन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेचा आज 54 वा वर्धापनदिन. गेली 54 वर्षे वर्धापनदिन सोहळा दरवर्षी अत्यंत थाटात आणि अफाट उत्साहात साजरा होत असे. देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो शिवसैनिक मुंबईत दाखल होत असत आणि एक नवा विचार, एक जाज्वल्य विचार घेऊन परतत असत… त्याच उत्साहात, त्याच जल्लोषात! यंदा मात्र कोरोनाचे संकट आहे. मुंबई, महाराष्ट्रासह अवघा देश या संकटाशी लढत आहे. त्यामुळे वर्धापनदिनाचा सोहळा साजरा होणार नसला तरी शिवसैनिकांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. तोच जोश आहे, तोच उत्साह आहे. शिवसेना मनामनात आहे!! विशेष म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी साडेबारा वाजता ‘झूम अॅप’च्या माध्यमातून शिवसेना नेते, उपनेते, जिल्हाप्रमुख आणि अन्य पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत.

शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित केला जाणारा विशेष कार्यक्रम आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे लाभणारे मार्गदर्शन याबाबत शिवसैनिकांमध्ये कमालीची उत्सुकता असते. यासाठी मोठ्या प्रमाणावर शिवसैनिकांची गर्दी उसळते. मात्र यंदा कोरोनाच्या संकटकाळात सोशल डिस्टन्सिंग पाळणे, गर्दी न करणे हे अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे अत्यंत साधेपणाने, सामाजिक उपक्रम राबवून आणि गर्दी न करता हा वर्धापनदिन साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई यांनी दिली.

वर्धापन दिन असा साजरा होणार
शिवसेना शाखा तसेच मध्यवर्ती कार्यालयांत मोजक्या शिवसैनिकांच्या उपस्थितीत गर्दी न करता सकाळी 10.30 वाजता भगवा ध्वज फडकवण्यात यावा. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात यावी. विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबवून तसेच जनजागृतीच्या माध्यमातून वर्धापनदिन साजरा करण्यात यावा, अशा सूचना शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आल्या आहेत.