तर उत्पल पर्रीकर यांच्या विरोधात उमेदवार देऊ नका! संजय राऊत यांच्या ट्विटची देशभरात चर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत भाजप नेते मनोहर पर्रीकर यांचा मुलगा उत्पल पर्रीकर यांच्या समर्थनात पुढे आले आहेत. त्यांनी उत्पल यांच्या निर्णयाचे समर्थन करत त्यांना पाठिंबा देण्यासंदर्भात भाजप विरोधातील सर्व पक्षांना आवाहन देखील केले आहे.

‘उत्पल यांना भाजपने उमेदवारी दिली नाही आणि ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असतील तर त्यांच्या विरोधात अन्य कोणत्याही पक्षाने उमेदवार देऊ नये. मनोहर पर्रीकर यांना हीच खरी श्रद्धांजली असेल,’ असे संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

उत्पल पर्रीकर यांनी पणजी मतदारसंघात घरोघरी जाऊन प्रचाराला सुरुवात केली आहे. उत्पल यांच्या रुपाने भाजपसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. उत्पल यांनी भाजपकडे पणजी मतदार संघातून उमेदवारी मागितली आहे. भाजपचे नेते मात्र त्यांना या मतदारसंघातून उमेदवारी देण्यास फारसे इच्छुक दिसत नाहीयेत. भाजप गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी उत्पल यांच्याबाबत बोलताना म्हटले होते की, ‘मनोहर पर्रीकरांचा मुलगा असल्याने त्या व्यक्तीला तिकीटासाठी योग्य मानले जाऊ शकत नाही.’ फडणवीसांच्या या विधानामुळे उत्पल यांना तिकीट देण्यास भाजप इच्छुक नाही असा तर्क काढला जात आहे. यामुळे उत्पल यांनी कोणाकडून उमेदवारी मिळेल याची वाट न पाहाता प्रचाराला सुरुवात केली आहे.