
शिवसेना हा लाव्हा आहे. शिवसेना मागे हटणार नाही. आमचं बळ हे आमच्या मनात आणि मनगटात आहे. सगळय़ांना एकत्रित घेऊन काम करा. शिवसेनेला जेवढं जास्त रेटाल तेवढी ती पुढे येईल. शिवसेनेवर जेव्हा वार झाले तेव्हा रक्ताच्या थेंबागणिक शिवसेना वाढत गेली. लोकांना एकत्रित घेऊन काम करा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जो मंत्र आहे 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण ते करा, असे आवाहन शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केले.
शिरूर आणि हवेली तालुक्यातील शिवसैनिकांचा मेळावा शिक्रापूर येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात खासदार राऊत हे बोलत होते.
खासदार संजय राऊत म्हणाले, आम्ही शिवरायांचे मावळे आहोत. पाठीमागून वार करत नाही. समोरून कोथळा काढतो, असे मी म्हटले होते. याचा त्यांना एवढा त्रास झाला की, गुन्हा दाखल करा म्हणाले. समोरून वार केल्यावर काय निघणार? कोथळाच निघणार, असा टोला त्यांनी चंद्रकांत पाटील यांना हाणला.
आमच्या दंडाशी बरोबरी करू नका
खासदार राऊत म्हणाले, ‘तुमच्या हातात असेल तर मला आता अटक करा. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा काढला. तुम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करा म्हणता का? इतिहास समजून घ्या. आमच्या दंडाशी बरोबरी करू नका. आमच्याकडे दंड आणि दांडा दोन्हीही असतो,’ असा इशाराही खासदार राऊत यांनी या वेळी दिला.































































