
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर शिवसैनिकांनी तुफान गर्दी केली आहे. आमदार रवी राणा यांनी आपण मातोश्रीसमोर हनुमान चालिसाचे पठण करणार असल्याचे म्हटले होते. यामुळे शिवसैनिकांनी शुक्रवारी सकाळपासूनच ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर जमायला सुरुवात केली. शिवसैनिकांचे जथ्थे हातात भगवा झेंडा घेऊन येथे दाखल झाले आणि ‘शिवसेना झिंदाबाद’च्या घोषणांनी आसमंत दणाणून निघाला. पोलिसांचा मोठा फौजफाटाही येथै तैनात करण्यात आला आहे. मातोश्री हे आमच्या दैवताचे ठिकाण आहे. इथे येणे मुश्कील आहे, त्यांनी स्वप्नातही असा विचार करू नये, असा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे.

भारतीय जनता पक्ष शिखंडीच्या माध्यमातून शिवसेनेवर वार करायला पाहतोय, पण हे एवढे साधे नाहीय. शिवसैनिक हा मर्द आहे, छत्रपतींची औलाद आहे, बाळासाहेबांची शिकवण आहे आणि उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व आहे. असल्या भडबुंज्यांना गाडून टाकण्यासाठी आम्ही सदैव तयार आहोत, असा इशारा खासदार विनायक राऊत यांनी दिला आहे. हिंमत असेल तर त्यांनी यायला हवे होते. नंदगिरीच्या गेस्ट हाऊसमध्ये दडून बसलेल्या राणाला उंदरासारखे बाहेर काढण्याची ताकद शिवसैनिकांमध्ये आहे. पण आम्हाला महाराष्ट्रातील शांतता, कायदा-सुव्यवस्था बिघडवायची नाहीय. शिवसैनिकांची परीक्षा पाहण्याची आणि ताकद आजमावण्याचा प्रयत्न कोणी करू नये, असा इशाराही त्यांनी दिला.

…तर ताकद दाखवावीच लागेल!
तसेच जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही आमचा संयम कायम ठेवलेला आहे. परंतु आमची शक्ती, ताकद आम्हाला दाखवावीच लागेल. कायदा सुव्यवस्था आम्ही बिघडवू देणार नाही, परंतु महाविकास आघाडीला बदनाम करणे, महाविकास आघाडीला खिळखिळे करणे आणि आपला राजकीय मनसुबा साध्य करण्याची जी कपट निती केंद्र सरकारमधून अवलंबली जाते त्याला शिवसैनिक सडेतोड उत्तर द्यायला सक्षम आहे, असेही विनायक राऊत म्हणाले.
शिवसेनेला डिवचण्याचा फाजीलपणा करू नका!
ही सगळी स्टंटबाजी असून शिवसेनेचा डिवचण्याचा फाजीलपणा करू नका. शिवसैनिक संयम आणि शिस्तीचा द्योतक आहे, परंतु ज्या-ज्या वेळी जी-जी गोष्ट करायचीय ती शिवसैनिक करतीलच, असे खासदार अनिल देसाई माध्यमांशी बोलताना म्हणाले. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात चांगल्या रितीने काम करत आहे. महाराष्ट्रातील जनता, शेतकरी, कर्मचारी संतुष्ट आहे. प्रत्येक संकटावर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने मात केली आहे. परंतु महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचे, दंगली घडवण्याचे आणि धर्मा-धर्मात वाद लावण्याचे प्रकार सुरू असल्याचे ते म्हणाले. तसेच शिवसेनेचे हिंदूत्व हेच खरे हिंदूत्व असून हे महाराष्ट्र, देश जाणतोय. इतरांनी कितीही सोंग घेतली, कांगावा केला तरी महाराष्ट्राची आणि देशाची जनता सर्व ओळखून आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
सगळी नौटंकी सुरुय
राणा दाम्पत्य हे नौटंकी, सुपारी बहाद्दर दाम्पत्य आहे. उद्धव ठाकरे आणि मातोश्रीवर बोलले की आपल्याला प्रसिद्ध मिळते हे त्यांना माहितीय. या प्रसिद्धीच्या हव्यासापोटी निंदणीय प्रकार, बालिशपणा सुरू असल्याची टिका मुंबईच्या माजी महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी केली. मातोश्रीकडे वाकड्या नजरेने बघू नका, शिवसैनिकांची माथी भडकावू नका. महाराष्ट्राचे नेतृत्य संयमी आणि सुसंस्कृत आहे, त्याची उगाचच विटंबणा करू नका, असा इशाराही त्यांनी दिला. हनुमान चालिसा आमच्या रक्तारक्तात आहे, असेही त्या म्हणाल्या.
एकदाचे या आणि प्रसाद घेऊन जा!
मातोश्री हे प्रत्येक शिवसैनिकासाठी मंदिरासमान, देवळासमान आहे आणि आमच्या मंदिरावरच कोणी आक्रमण करण्याची भाषा कोणी करत असेल शिवसैनिक आक्रमक आहेत. आक्रमकता आमच्या डीएनएमध्ये आहे. ज्याने कोणी आव्हान दिलेय त्याची वाट पहात आम्ही थांबलोय. त्यांनी हनुमान चालिसा म्हटल्यानंतर प्रसाद द्यायला शिवसैनिक मोठ्या संख्येने जमले आहेत. महिला शिवसैनिकही मोठ्या संख्येने उपस्थित असून एकदाचे या आणि प्रसाद घेऊन जा, असे युवासेना सचिव वरुण सरदेसाई म्हणाले.


































































