
राज्यातील सरकार आता थोडय़ा दिवसांचेच पाहुणे आहे. हे सरकार पुढील दोन महिन्यांत अपात्र ठरेल. त्यानंतर तुम्हाला वधस्तंभावर जावेच लागेल. त्याचा खटका दाबण्याचे काम जनता करेल, असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मिंधे सरकारवर केला. ‘‘मी पुन्हा येईन, पण फौजदाराचा शिपाई होऊन नव्हे’’, असा सणसणीत टोला त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
पाटण तालुक्यातील ढेबेवाडी खोऱयातील तळमावले येथे रविवारी ‘शिवसंवाद मेळाव्या’त खासदार संजय राऊत बोलत होते. यावेळी शिवसेना उपनेते व पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील, जिल्हाप्रमुख हर्षद कदम, सचिन मोहिते यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
थोडय़ाच दिवसांत राज्यातील सरकार अपात्र ठरणार आहे. हे मी नाही तर सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दांत सांगितले आहे. आता तुम्ही किती वेळ काढणार आहात, असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला. त्यानंतर या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आपल्या मनातला मुख्यमंत्री होईल, असा जबरदस्त विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पाटणचा पुढचा आमदार शिवसेनेचाच होईल, हा तुमचा उत्साहच सांगतोय. येथील गद्दारी याच तालुक्यात गाडून टाकण्याचा निर्धार करा, असे आवाहन करतानाच, संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही चिमटा काढला. ‘मी पुन्हा येईन, पण फौजदाराचा शिपाई होऊन नव्हे; मी पुन्हा येईन, ते पाटण तालुक्यावर फडकलेला भगवा पाहायला आणि गद्दारांना गाडलेले पाहायला येईन’, असे त्यांनी सांगितले.
एकही निवडून येणार नाही
ज्या पद्धतीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे लोकाभिमुख सरकार या चाळीस गद्दारांनी बेइमानी करून पाडले. त्यांची इतिहासात बेईमान, गद्दार अशीच नोंद होईल. यातील एकही जण पुन्हा निवडून येणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
… ही शिवसेनाप्रमुखांची पुण्याई
परवा पाटण्याला झालेल्या विरोधी पक्षांच्या राष्ट्रीय परिषदेला विविध राज्यांचे माजी मुख्यमंत्री, पाच राज्यांचे विद्यमान मुख्यमंत्री उपस्थित होते. तरीही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी स्वतः बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार विमानतळावर उपस्थित होते. ही शिवसेनाप्रमुखांची, महाराष्ट्राची पुण्याई आहे आणि हीच खरी शिवसेना आहे, असे उद्गार खासदार संजय राऊत यांनी काढले. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख रवींद्र पाटील, तालुकाप्रमुख सचिन आचरे यांचीही भाषणे झाली.
पाडळी शाखेचे उद्घाटन, सुपनेला भेट
‘शिवसंवाद मेळाव्या’ला जाण्यापूर्वी कराड तालुक्यातील पाडळी (केसे) येथील शिवसेना शाखेचे उद्घाटन खासदार राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच सुपने ग्रामपंचायतीलाही त्यांनी सदिच्छा भेट दिली.
गद्दारांना पुन्हा दारात उभे करणार नाही!
चाळीसजणांनी ज्या पद्धतीने शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, तो घाव विसरण्यासारखा नाही. काही घाव माफ करून टाकण्यासारखे असतात, पण काही माफ करण्यासारखे नसतात. त्यातील हा एक आहे. हे गद्दार परत आले तर घेणार का, असे विचारले जाते. एकवेळ शिवसेना बरखास्त करून टाकू, पण या गद्दारांना पुन्हा दारात उभे करणार नाही, असे खासदार संजय राऊत यांनी निक्षून सांगितले. शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचा हे निवडणूक आयोग ठरवू शकत नाही. ते जनता ठरवेल. हिंमत असेल तर विधानसभा, लोकसभा किंवा कोणतीही निवडणूक घ्या, पण यांच्यात हिंमत नाही. मुंबईत मोदी – शहांच्या सभा होऊद्या, फडणवीसांच्या होऊद्या. मुंबईवर उद्धव साहेबांच्या शिवसेनेचाच भगवा फडकणार, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रचंड पुष्पवृष्टी, औक्षण अन् आतषबाजी
सायंकाळी तळमावले येथे खासदार संजय राऊत यांचे आगमन झाले, तेव्हा त्यांच्यावर प्रचंड पुष्पावृष्टी करण्यात आली. सुवासिनींनी त्यांचे औक्षण केले. त्यानंतर फटाक्यांच्या आतषबाजीत, वाद्यांच्या गजरात आणि ‘कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला’, अशा घोषणांच्या निनादात त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक मार्गावर जागोजागी खासदार राऊत यांच्या स्वागताचे भव्य फ्लेक्स, भगवे झेंडे व पताका लक्ष वेधून घेत होत्या. तरुणाईमध्ये विलक्षण चैतन्य जाणवत होते. रस्त्याच्या दुतर्फा तसेच इमारतींवर उभे राहिलेले नागरिक हात उंचावून खासदार राऊत यांना प्रतिसाद देत होते. मेळाव्यात तर उपस्थितांनी गगनभेदी घोषणांनी सभागृह डोक्यावर घेतले होते.
उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रिपदाचा काळ हा महाराष्ट्राचा सुवर्णकाळ – नितीन बानुगडे-पाटील
चाळीस गद्दार गेले, पण 140 निवडून आणण्याची ताकद येथील जनतेच्या मनगटात आहे. भाजप व मिंधे गटाने महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाची ऐशी-तैशी करून टाकली आहे. त्यामुळे ‘कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?’ असे लोक म्हणत आहेत. उद्धव साहेबांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात एकही उद्योग महाराष्ट्रातून बाहेर गेला नाही. आता महाराष्ट्रात आलेले मोठे उद्योग गुजरातला गेले. यासाठीच तुम्हाला उद्धव साहेब मुख्यमंत्री नको होते काय, असा सवाल शिवसेना उपनेते व पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील यांनी केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रिपदाचा काळ हा महाराष्ट्राचा सुवर्णकाळ होता, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. शिवसेनेचे नाव घेतले, चिन्ह घेतले; पण शिवसैनिकांच्या उरातील जिद्द कशी काढून घेणार? असा सवाल करत उद्धवजींच्या नेतृत्वाखाली विधान भवनावरच नव्हे तर दिल्लीच्या तख्तावरही भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पाटण तालुक्यातील जनता गद्दारांवर चिडून आहे – हर्षद कदम
मागील 25 वर्षांत पाटण तालुक्यातील शिवसैनिकांनी खूप त्रास सोसला आहे. त्यांना कधीही त्यांच्या व्यासपीठावर सन्मान दिला गेला नाही. आता आम्ही आमचे व्यासपीठ निर्माण केले आहे. एक वर्षापूर्वी उद्धव साहेबांच्या पाया पडणारे आता त्यांच्यावर बोलू लागले आहेत, असे सांगत जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी संताप व्यक्त केला. शंभूराज देसाई यांची निष्ठा कोणावरच नाही. रस्त्यापलीकडे त्यांचा विकास नसतो. कारण रस्त्यात पैसे मिळतात, अशी घणाघाती टीका त्यांनी केली. कामांमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराचा हिशेब द्यावाच लागेल. इथून पुढे हे चालणार नाही. तालुक्यातील जनता प्रचंड चिडून आहे. सत्तेचा मस्तवालपणा सुरू आहे. 2023 ला तालुक्यातील भगवा ढळू देणार नाही, असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला.
































































