
राज्यातील चार मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकलेले आहेत. त्यातील दोन भारतीय जनता पक्षाचे आहेत. हनी ट्रॅपची टोळीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात असून त्यांना वाचवण्यासाठी ते दिशाभूल करत आहेत, असा खळबळजनक आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. ते दिल्लीत माध्यमांशी संवाद साधत होते.
हनी ट्रॅपची सुरुवात दिल्लीतून झाली होती. महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी हनी ट्रॅपचा सापळा रचण्यात आला. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबत अल्प माहिती दिली. हनी ट्रॅपमुळे सरकार पडले असे ते म्हणाले. पण सरकार पडले नाही, तर पाडले. याच माध्यमातून 16-17 आमदार, चार खासदार भाजपने गळावा लावले, असा दावा करत संजय राऊत यांनी ‘दैनिक सामना’तील उद्याचा अग्रलेख जरूर वाचा असे म्हटले. त्यामुळे सामनाच्या अग्रलेखात उद्या काय असणार याचा विचार करून सत्ताधाऱ्यांना कापरे भरले आहे.
महाविकास आघाडीचे सरकार पाडताना जे वेष पालटून जात होते, ते याच कारणातून एकमेकांना भेटत होते, असा दावाही संजय राऊत यांनी केला. हुडी घालून मरीन लाईनच्या पुलाखाली काळोखात भेटत होते. या सीडी प्रकरणामुळेच काही लोकांना दरदरून घाम फुटला आणि त्यांनी पटापट उड्या मारून सूरतचा रस्ता पकडला, असा दावाही राऊत यांनी केला. ना भाजपचा हिंदुत्वाशी संबंध आहे, ना एकनाथ शिंदे यांचा हिंदुत्वाशी काही संबंध आहे. ना अजित पवार यांचा फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांशी संबंध आहे. यांची पळून जाण्याची कारणे वेगळी आहेत, असेही ते म्हणाले.
राऊत पुढे म्हणाले की, विधान सभेमध्ये हनी ट्रॅपचा विषय आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याच्या चौकशीची घोषणा करायला हवी होती. मात्र त्यांनी सरळ सरळ उडवून लागले. ते त्यांच्या लोकांना वाचवत आहेत. नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांनी हा मुद्दा काढला. वृत्तपत्रातही बातम्या येत आहेत. तरीही मुख्यमंत्री अशा लोकांचे समर्थन करत आहेत. मग कोणत्या नैतिकतेच्या गप्पा तुम्ही मारता? असा सवाल करत संजय राऊत यांनी गृहखाते घाशिराम कोतवाल पद्धतीने चालवले जात असल्याचा टोला लगावला.
Honey trap case – गिरीश महाजनांच्या ‘या’ फोटोची CBI मार्फत चौकशी करा; संजय राऊत यांचे ट्विट बॉम्ब
मंत्र्यांचे, आमदारांचे, पदाधिकाऱ्यांचे एक एक प्रकरण समोर येत आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट भविष्यात सरकारमध्ये असेल का याबाबत शंका वाटते. मिंधे गटाचे केंद्राला आणि महाराष्ट्रालाही ओझे झाले आहे. या लोकांमुळे महाराष्ट्र, भाजप बदनाम होत आहे. अर्थात भाजपही धुतल्या तांदळासारखा नाही किंवा मोगऱ्याचे सुगंधी फूलही नाही. पण त्यांना मिंधे गटाचे ओझे झाले असून लवकरच ते जातील, असेही राऊत म्हणाले.