महाराष्ट्रात तीन घाशीराम कोतवाल सरकार चालवत आहेत; संजय राऊत यांचा घणाघात

महाराष्ट्रामध्ये घाशीराम कोतवालांचे राज्य सुरू असून तीन घाशीराम कोतवाल सरकार चालवत आहेत. त्यामुळे त्यांना नैतिकतेवर बोलण्याचा अधिकार नाही. त्यांच्या मंत्रिमंडळातील जवळपास सर्वच मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप असून खटले सुरू आहेत आणि हे लोकांवर बोट उचलताहेत, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. ते माध्यमांशी बोलत होते.

पेशवे काळामध्ये घाशीराम कोतवालावर पुण्याच्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी होती. मात्र त्याचा कार्यकाळ बघा. त्याच्या काळात लुटमार, दरोडोखोरी, कायदा व सुव्यवस्थेची अनागोंदी होती. तोच लुटमार, दरोडे टाकून पैसे आणि सगळंच मालकांपर्यंत पोहोचवायचा. घाशीराम कोतवाल हे नाटकही महाराष्ट्रात गाजले. घाशीराम कोतवाल ही विकृती होती. आज राज्यावर घाशीराम कोतवालाचे राज्य आहे, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.

आज दै. सामनामध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘भाजपच्या नैतिकतेचे ऑडिट‘ या अग्रलेखातून भाजपच्या नैतिकतेचे ऑडिट करण्याची मागणी करण्यात आली आहे. या अग्रलेखाची सर्वत्र चर्चा असताना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली. इक्बाल मिर्चीसोबत संबंध असणारे प्रफुल्ल पटेल तुमच्या मंत्रीमंडळात कसे? असा सवाल भाजपनेच युपीए सरकारला विचारला होता. पण आज प्रफुल्ल पटेल त्यांच्यासोबत बसले आहेत. नवाब मलिक चालत नाहीत, मग प्रफुल्ल पटेल कसे चालतात? कायदा, नैतिकता, देशभक्तीच्या बाता मारता, मग नवाब मलिक यांच्यासाठी देशभक्तीची व्याख्या वेगळी आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी वेगळी आहे का? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. काल म्हणालो त्याप्रमाणे तू मारल्यासारखे करत आणि मी रडल्यासारखे करतो असे ढोंग सुरू असून ते बंद करा, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

भारतीय जनता पक्ष छाती फुटेपर्यंत नैतिकतेचे फुगे फुगवतो. पण यांच्याकडे नैतिकता औषधाला तरी शिल्लक आहे का? भाजपच्या नैतिकतेचे ऑडिट झालेच पाहिजे. नवाब मलिक प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहिण्याचे नाटक केले ते प्रफुल्ल पटेल यांच्याविषयी का नाही? दोघांचे अपराध, गुन्हे सारखे आहेत. दोघांवर ईडीने कारवाई केली आहे. दोघांचे दाऊदशी संबंध दाखवले आहेत. दोघांनी दाऊदत्या हस्तकांकडून संपत्ती खरेदी केली आहे. पण प्रफुल्ल पटेल हे पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहांच्या मांडीला मांडी लावून बसतता आणि इकडे फडणवीस म्हणतात आम्ही नवाब मलिक यांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही, अशी टीका राऊत यांनी केली.

आज सकाळी शिंदे गटाचा पोपट बोलला की आम्ही नवाब मलिक यांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाहीत. हे बोलणारे नवाब मलिकांचे बाप आहेत. बेईमान, गद्दार लोकांनी ईडी आणि सीबीआयला घाबरून जे पलायन केले त्याचे कारण त्यांच्यावर भयंकर आरोप आहेत. त्यांच्या मागे ईडी लागली आहे, अटकेचे वॉरंट निघाले आहेत आणि हे नवाब मलिकांबाबत बोलत आहेत, अशा शब्दात राऊत यांनी मिंधे गटाची सालटी काढली.

दरम्यान, ललित पाटील ड्रग्स प्रकरणात दोन मंत्र्यांचा थेट सहभाग असून हे दोन्ही मंत्री मिंधे गटाचे आहेत. ललित पाटीलला तुरुंगातून ससूरमध्ये आणून त्याची वर्षभर बडदास्त ठेवण्यापासून ते त्याच्याकडून हप्ते वसूल करून वरपर्यंत पोहोचवण्यापर्यंत, त्याच्या साम्राज्याला संरक्षण देण्यापर्यंत दोन मंत्री सहभागी आहेत. पोलिसांनी तपास करून त्यांच्यापर्यंत पोहोचावे अन्यथा आम्ही नावे जाहीर करू, असा इशारा राऊत यांनी दिला.