अणुशक्तीनगरमध्ये प्रदूषणकारी ‘आरएमसी’ प्लांट पुन्हा सुरू करण्याचा घाट, परवानगी न देण्याची शिवसेनेची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अणुशक्तीनगर विधानसभा क्षेत्रातील प्रयागनगर व प्रकाशनगरच्या भरवस्तीमध्ये हवा आणि ध्वनी प्रदूषण करणारा ‘आरएमसी’ प्लांट पुन्हा एकदा सुरू करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे समोर आले आहे. यामुळे हवा, ध्वनी प्रदूषण वाढण्याच्या शक्यतेमुळे रहिवाशांमध्ये पुन्हा एकदा भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी ‘आरएमसी’ प्लांट सुरू करण्याची परवानगी देऊ नये अशी मागणी शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) केली आहे. याबाबत आरसीएफ पोलीस ठाणे, चेंबूरला माजी नगरसेविका निधी शिंदे यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.

प्रयागनगर व प्रकाशनगर प्रभाग क्र. 148 मध्ये एल.यू. गडकरी मार्गावर 2013 ते 2017 या कालावधीत चार वर्षांपर्यंत अमित बिल्डिंग मटेरियल सप्लाय प्रा.लि. कंपनीद्वारे आरएमसी प्लांट बेकायदेशीररीत्या चालू होता. यामुळे प्रदूषण मोठय़ा प्रमाणावर होत असल्याच्या तक्रारी स्थानिक रहिवाशांनी केल्यामुळे पाठपुरावा करण्यात आला. यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळ, उच्च न्यायालय, लोकायुक्त व विविध ठिकाणी हा विषय मार्गी लागल्यानंतर 6 ते 8 महिन्यांत हा आरएमसी प्लांट बंद करण्यात आला. यामुळे या परिसरातील शेकडो नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. मात्र आता पुन्हा एकदा हा प्लांट सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे समजते.

तर जनमत सुनावणी घ्या!

भरवस्तीमध्ये हा प्लांट सुरू झाल्यास हवा आणि ध्वनी प्रदूषण वाढणार असून आजारी माणसांनाही याचा मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र पदूषण नियंत्रण मंडळाने या प्लांटला परवानगी देऊ नये. प्लांटसाठी विनंती अर्ज आल्यास जनमत सुनावणी घेऊन लोकांचे म्हणणे ऐकून घ्यावे, अशी मागणीही शिवसेनेने केली आहे.

महापालिकेनेही या ठिकाणी अनधिकृत काम सुरू असल्यास तातडीने काम बंद करावे, पोलिसांनी रहिवाशांना धीर द्यावा, अशी मागणीही शिवसेनेकडून करण्यात आली आहे. याआधीदेखील या ठिकाणी आरएमसी प्लांट सुरू करण्यासाठी काही जणांकडून विरोधकांना धाक दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांनी कार्यवाही करावी, असेही शिंदे यांनी पत्रात म्हटले आहे.