
हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करणाऱया व इतिहासाचे ज्ञान नसतानाही शिवरायांच्या कर्तृत्वाला कमी लेखण्याच्या दुष्ट हेतूने बेताल वक्तव्य करणाऱया राज्यपाल भगतसिंग कोशारी यांचा राज्यभरात निषेध सुरूच आहे. आजही अनेक ठिकाणी शिवसैनिकांनी आंदोलन करून राज्यपाल कोश्यारी यांच्या निषेधार्थ निदर्शने केली.

राज्यपाल भगतसिंग कोशारी यांचा जाहीर निषेध करण्यासाठी कांदिवली येथे विभागप्रमुख सुधाकर सुर्वे यांच्यावतीने जनआंदोलन करण्यात आले. त्याप्रसंगी विभागसंघटक मनाली चौकीदार, नगरसेविका शुभदा गुढेकर, गीता भंडारी, विभागसंघटक संतोष राणे, मधुकर राऊत, अनिल भोपी, नंदकुमार मोरे, संतोष धनावड, सुवर्णा कोठावळे, मीना कारंडे, उपविभागप्रमुख उदय रुघाणी, रविंद्र वेदपाठक, प्रदीप ठाकूर, प्रकाश म्हादाळकर, राजन निकम, चंदन शिंगरे, आकांक्षा नागम, ज्योती गावडे, सुवर्णा प्रसादे, अंजली चव्हाण यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी जनआंदोलनात सहभाग घेतला.

आमदार व विभागप्रमुख सदा सरवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागप्रमुख यशवंत विचले यांच्या नेतृत्वाखाली दादर येथील सुविधा शोरूम समोर निदर्शन करून राज्यपाल कोश्यारी यांचा निषेध केला गेला. त्यानंतर शिवसेना भवन पर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. त्यात नगरसेविका प्रीती पाटणकर, उपविभाग समन्वयक कुणाल वाडेकर, शाखा समन्वयक अभिजित राणे, रमेश सोडये आणि मोठय़ा प्रमाणात शिवसैनिक सहभागी झाले होते.






























































