
शिवसेनेशी गद्दारी करून भाजपच्या इशाऱयावर गुवाहाटीमध्ये आश्रय घेतलेल्या एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील गद्दार आमदारांविरोधात रविवारी राजधानीतील जंतरमंतरवर दिल्ली शिवसेनेच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘उद्धव ठाकरे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा देत शिवसैनिकांनी ऐतिहासिक जंतरमंतरचा परिसर दणाणून सोडला. दिल्ली प्रदेश शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख मंगतराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या निदर्शनात केशव उपाध्याय, मास्टर अजित सिंग, चेतन शर्मा यांच्यासह शिवसैनिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.


























































