रद्द करा.. रद्द करा.. इंधन दरवाढ रद्द करा! ठाण्यात महागाईविरोधात शिवसेनेचे ‘स्वाक्षरी आंदोलन’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रद्द करा.. रद्द करा.. इंधन दरवाढ रद्द करा, जनता त्रस्त.. मोदी परदेशी वारीत व्यस्त, अशा जबरदस्त घोषणा देत आज शिवसेनेच्या वतीने ठाणे रेल्वे स्थानकाजवळ ‘स्वाक्षरी आंदोलन’ करण्यात आले. त्यास मोठा प्रतिसाद मिळाला. असंख्य ठाणेकरांनी ‘निषेधाची स्वाक्षरी’ करून महागाईविरोधात आपला राग व्यक्त केला. पेट्रोल-डिझेलचे भरमसाठ वाढलेले दर, भाज्यांचे गगनाला भिडलेले भाव, महिलांवरील अत्याचार यांमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त असून महागाईचा हा राक्षस जनताच चिरडून टाकेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

शिवसेना पक्षाचे नेते व माजी खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर महागाईच्या विरोधात हे आंदोलन केले आहे. महागाई वाढण्यास केंद्रातील सरकारची चुकीची आर्थिक धोरणे आणि अपयशी ठरलेली परराष्ट्र नीती जबाबदार असल्याची टीका यावेळी करण्यात आली. भाजप सरकारच्या काळात महागाईचा भडका… सामान्यांच्या खिशाला बसताय रोज फटका, कुठे गेले ते अच्छे दिन, जनतेच्या पैशांवर परदेश वारी… हीच का तुमची देशभक्ती याची, अशा घोषणांचे फलक शिवसैनिकांच्या हातात होते.

महागाईविरोधातील स्वाक्षरी आंदोलनात शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, ओवळा-माजिवडा संपर्कप्रमुख नरेश म्हस्के, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, ठाणे महानगर संघटक महेश कदम यांच्यासह उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील, महिला जिल्हा संघटक रेखा खोबरे, प्रतीक राणे, हेमंत राऊतकर, अमोल हिंगे, माजी नगरसेविका महेशी तरे, ज्योती कोळी, प्रफुल भांगे, सुनंदा देशपांडे, राम कोळी, माजी परिवहन सदस्य राजेंद्र महाडिक, प्रदीप वाघ आदी सहभागी झाले होते.

मोदी सरकारच्या कथनी व करणीमध्ये फरक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेल, गॅस कमी वापरा, सोने खरेदी बंद करा, परदेश दौरे करू नका असे सल्ले दिले. जनतेला आवाहन केल्यानंतर लगेच युरोपीय देशांच्या दौऱ्यावर ते स्वतः निघून गेले. मोदी सरकारच्या कथनी व करणीमध्ये फरक आहे. ‘लोकांना सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण’ अशी अवस्था सरकारची झाली आहे. — राजन विचारे (शिवसेना नेते व माजी खासदार)

मंत्री, खासदारांनी स्वतःचा पगार देशासाठी द्यावा

महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. एकीकडे जनता गॅस, पेट्रोल, भाजीपाला आणि औषधांच्या दरवाढीमुळे होरपळत असताना दुसरीकडे मंत्री एसी गाड्यांमधून फिरून देशभक्तीचे फोटोसेशन करत आहेत. जर खरोखरच देशप्रेम असेल तर सर्व मंत्री, आमदार आणि खासदारांनी स्वतःचा पगार व पेन्शन देशासाठी समर्पित करावी. — केदार दिघे (ठाणे जिल्हाप्रमुख)