शिवसेना खंबीरपणे लोणीकर यांच्या पाठीशी- खासदार संजय जाधव

511

जालना जिल्ह्यातील परतूर-मंठा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून विकासाची गंगा परतूर विधानसभा मतदार संघात आली आहे. मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी लोणीकर यांनी प्रयत्न केले आहेत. लोणीकर यांच्या माध्यमातून होत असलेल्या चौफेर विकास कामाचे यावेळी खासदार जाधव यांनी कौतुक केले.

मंठा येथे आयोजित शिवसेना पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या मेळाव्यात खासदार संजय जाधव बोलत होते. यावेळी खासदार संजय जाधव यांनी महायुतीच्या वतीने लोणीकर यांना शुभेच्छा दिल्या. शिवसेना आणि सर्व घटक पक्ष संपूर्ण ताकदीनिशी बबनराव लोणीकर यांच्या पाठीशी असल्याचे यावेळी जाधव यांनी स्पष्ट केले. मतदारसंघाच्या सर्वांगिण विकासासाठी विकासाच्या मुद्यावर शिवसेना खंबीरपणे लोणीकर यांच्या पाठीशी असल्याचे यावेळी जाधव म्हणाले.

तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख ए.जे.बोराडे म्हणाले की, ज्याप्रमाणे लोकसभेला बबनराव लोणीकर आणि राहुल लोणीकर यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचे सारथ्य केले. अगदी त्याच पद्धतीने शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून मी स्वतः विधानसभेत सारथी असणार आहे. मतदारसंघाचा केलेला कायापलट कुणीही नाकारू शकत नाही. मतदारसंघात विरोधकांनी रचलेला डाव उधळून लावण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट शिवसैनिक सज्ज असून महायुतीचे उमेदवार बबनराव लोणीकर यांना २० हजारापेक्षा अधिक मताधिक्य मंठा तालुक्यात मिळवून देणार असल्याचे आणि विरोधकांकडे लोणीकर यांच्याविरोधात बोलण्यासाठी मुद्दाच शिल्लक नसल्याचे बोराडे यांनी स्पष्ट केले.

यावेळी पुढे बोलताना महायुतीचे उमेदवार तथा पालकमंत्री बबनराव लोणीकर म्हणाले की, परतूर- मंठा विधानसभा मतदार संघातील नेर, सेवली विधानसभा मतदारसंघात चार हजार ७०० कोटी रुपयाच्या विकास कामांच्या माध्यमातून मतदारसंघाचा अनुशेष भरून काढण्याचा प्रयत्न केला .आपण केलेल्या विकासाच्या जोरावर प्रचंड मताधिक्क्याने विजय होणार असल्याचे, प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले. यावेळी भाजप- शिवसेना मित्रपक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या