गुजरात लॉबी आधी धारावीचा घास घेणार, मग मुंबई गिळणार; संजय राऊत यांचा घणाघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील उद्योग-रोजगाराचे प्रमुख केंद्र असलेली धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली ‘अदानी’च्या घशात घालण्याचा डाव हाणून पाडण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली दीड लाखाचा प्रचंड महामोर्चा आज ‘बीकेसी’तील ‘अदानी’च्या कार्यालयावर धडकणार आहे. हा मोर्चा फक्त धारावी वाचवण्यासाठी नाही, तर मुंबई वाचवण्यासाठी आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या नावाखाली देशातील सर्वात मोठा टीडीआर घोटाळा होताना दिसतोय. धारावी वाचवा म्हणजे मुंबई वाचवा. धारावी हा पहिला घास आहे आणि त्यानंतर मुंबई गिळण्याचे गुजराती लॉबीचे फार मोठे कारस्थान असल्याचा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला.

मुंबई गिळण्याचे गुजरात लॉबीचे गुजरात मॉडेल जबरदस्त पद्धतीने पुढे जात आहे. संपूर्ण प्रकल्पाचा अभ्यास केला तर असे दिसून येते की भाजपचे जावई गौतम अदानी आणि त्यांच्या कंपनीच्या नावावर संपूर्ण मुंबईचा सातबारा केला आहे अशा पद्धतीने हा प्रकल्प निर्माण केलेला आहे. धारावीतील गरीब लोकांना त्यांची घरं मिळायली पाहिजे. पण तिकडे त्यांचे वेगवेगळे व्यवसाय आहेत, आणि ते व्यवसाय करण्यासाठी त्यांना तिथेच जागा मिळायली हवी ही आमची भूमिका आहे, असे म्हणत खासदार संजय राऊत यांनी हा प्रकल्प सरकार का करत नाही? असा सवालही केला. सरकारने भागीमध्ये हा प्रकल्प करावा, त्याऐवजी इतकी मोठी धारावी एका उद्यापतीच्या घशात घातली जात आहे, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.

गुजरातमध्ये गेल्या काही काळापासून गौतम अदानी यांच्या मुंद्रा बंदरावर सातत्याने ड्रग्ज उतरत असून ते महाराष्ट्रात येत आहे. आता अख्खी धारावीच जर अशा लोकांच्या हातात जाणार असेल तर अख्ख्या मुंबईत ड्रग्जचा व्यापार करायचा आहे का? अशी शंका लोकांच्या मनात आहे. धारावीतील पोरांना ड्रग्जच्या पुड्या विकायला द्यायच्या का? असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला. धारावी पुनर्विकास प्रकल्प हा धारावीच्या जनतेच्या तोंडाला पानं पुसून एक प्रकारे आवळा देऊन कोहळा काढण्याचा प्रकार असून मुंबई विकण्याचे कारस्थान आहे. देशातील सर्वात मोठा टीडीआर घोटाळा धारावी पुनर्विकास प्रकल्पात होत आहे, असा आरोप राऊत यांनी केला.

दरम्यान, शिवसेनेचा हा मोर्चा धारावीतील टी जंक्शनपासून निघेल आणि बीकेसीतील अदानींच्या मुख्यालयापर्यंत जाईल. अदानींच्या विरोधात हा मोर्चा निघू नये यासाठी दिल्लीतून वरिष्ठ स्तरावरून महाराष्ट्र सरकारवर दबाव टाकण्यात आला. धारावीतील लोकांची मुस्कटदाबी करण्यासाठी पोलिसांवर, प्रशसनावर, सरकार तर मिंधे आहेच.. सगळ्यांवर दबाव होता आणि हा दबाव मोडून आम्ही मोर्चा काढतोय. कारण आम्हाला मुंबई, महाराष्ट्र वाचवायचा आहे. सरकारकडून यातही फूट पाडण्याचा प्रयत्न झाला. मात्र जनता आमच्यासोबत असून कशाचीही पर्वा न करता जनता मोर्चात सहभागी होईल आणि लाखांचा मोर्चा निघेल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

देशातील सगळ्यात मोठा टीडीआर घोटाळा धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या निमित्ताने समोर येईल आणि त्या घोटाळ्यात भाजपचे हात कसे बरबटलेले आहेत हे सुद्धा समोर येईल. मुंबईच्या निर्मितीत, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ज्यांचे शून्य योगदान आहे असे लोकच धारावीचा सौदा करू शकतात, अशी टीकाही राऊत यांनी केली.