संभाजीराजेंना पुढे करून कपटी डाव मांडण्याचा प्रयत्न होता – संजय राऊत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छत्रपती संभाजीराजे यांना अपक्ष लढवण्याचा डाव भाजप व देवेंद्र फडणवीस यांचा होता असा आरोप छत्रपती संभाजी राजे यांचे वडील छत्रपती शाहू महाराज यांनी केला. त्यामुळे भाजपचे यावरून सुरू असलेले घाणेरडे राजकारण उघडे पडले आहे. छत्रपतींनी केलेल्या वक्तव्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रीया देत हा सर्व भाजपचा कपटी डाव असल्याचे सांगितले.

” आज एक स्पष्ट झालं की कोल्हापूरच्या मातीत सत्य आणि प्रामाणिकपणा टिकून आहे. शाहू घराण्याने सुद्धा सत्याची कास सोडली नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. शिवसेनेने कधीच कुणाची फसवणूक केलेली नाही. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस यांनी जी विधान केली की आम्ही संभाजी राजेंची ठरवून कोंडी केली ते किती खोटं होतं हे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या निवेदनातून स्पष्ट झालं आहे. त्यासाठी आम्ही त्यांचे आभार मानतो” असे संजय राऊत यांनी सांगितले.

”शाहू माहराजांचा अनुभव हा दांडगा आहे. छत्रपती शाहू माहाराज व हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा निकटचा स्नेह होता. ठाकरे व शाहू घराण्याचा निकटचा संबंध या विधानातून दिसून आला. काही लोकांनी महाराष्ट्रात या निमित्ताने पेटवापेटवीची भाषा केली. शिवेसनेला बदनाम करण्याची भाषा केवली. शिवसेनेने कधी या प्रकरणात खालच्या पातळीचं राजकारण केलेलं नाही.” असे सांगत संजय राऊत यांनी भाजप व देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला.

”आमची भूमिका मी स्पष्ट केली होती. सहावी जागा शिवसेनेची जाईल व त्यासाठी आम्ही प्रस्ताव ठेवला होता. कुणीतरी संभाजी राजांना पुढे करून महाराष्ट्रात एक वेगळ्या प्रकारचा डाव खेळण्याचा प्रयत्न करत होतं. हा डाव नव्हता एक वेगळ्या प्रकारचं कपट होतं. हे आज स्वत: छत्रपतींनी स्पष्ट केलं. सत्याची सचोटी व प्रामाणिकपणा यामुळेच आजही महाराष्ट्र शाहू महाराजांसमोर झुकतो. महाराष्ट्रावर संकट आलं की कायम या घराण्याने भूमिका घेतलेली आहे.”, असे सांगत त्यांनी छत्रपती शाहू महाराजांचे आभार मानले.