शिवतीर्थावर घुमणार आवाज शिवसेनेचाच! दसरा मेळाव्याला परवानगी

दादरच्या शिवतीर्थावर आवाज शिवसेनेचाच घुमणार आहे. महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा असलेला शिवसेनेचा दसरा मेळावा यावर्षी 2 ऑक्टोबर रोजी मोठय़ा दिमाखात शिवतीर्थावर होणार असून मुंबई महापालिकेने आज या मेळाव्याला परवानगी दिली.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर दसरा मेळाव्यास परवानगी मिळावी म्हणून शिवसेनेने महापालिकेकडे अर्ज केला होता. या अर्जानुसार महापालिकेची आज मेळाव्याला परवानगी मिळाली.

मेळाव्याला परवानगी देताना महापालिकेकडून 25 अटी घालण्यात आल्या आहेत. शिवतीर्थावरील मेळाव्यासाठी असलेल्या न्यायालयाच्या अटी आणि शर्तींचे पालन करण्यात यावे, ध्वनीप्रदूषण कायद्यातील तरतुदी पाळाव्यात यासह पोलीस, अग्निशमन परवानगी आणि रात्री 10 पर्यंतची वेळ यांचा त्यात प्रामुख्याने समावेश आहे. दरवर्षीप्रमाणेच या अटी असणार आहेत.