शेतकरीविरोधी नैना प्रकल्प रद्द झालाच पाहिजे, शिवसेनेची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पनवेल तालुक्यातील गावांमध्ये राबविण्यात येत असलेला नैना प्रकल्प हा बिल्डर्स, दलालांच्या फायद्यासाठी असल्याचा गंभीर आरोप करतानाच हा शेतकरीविरोधी प्रकल्प रद्द झालाच पाहिजे, अशी मागणी विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.

अल्पकालीन चर्चेद्वारे शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी नैना प्रकल्पाचा मुद्दा उपस्थित केला होता. यावेळी झालेल्या अंबादास दानवे यांनी सहभाग घेतला. नैना प्रकल्प होत असलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी करून आपण प्रकल्पबाधितांशी भेट घेतली. स्थानिक भूमिपुत्र व विशेषतः शेतकऱयांना देशोधडीला लावणारी ही योजना आहे असे दानवे म्हणाले. शेतकऱयांकडून प्रकल्पासाठी त्यांची 60 टक्के जमीन घेतली जाणार आहे आणि उर्वरित 40 टक्के जमीनही त्यांना दुसऱया ठिकाणी दिली जाणार आहे. हा एकप्रकारे अन्याय असल्याचे दानवे म्हणाले.

मुख्यमंत्री स्वतः बैठक घेणार

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या चर्चेला उत्तर देताना, नैना प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री स्वतः बैठक घेणार असून त्यावेळी स्थानिक ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींनाही बोलवण्यात येईल असे सांगितले. स्थानिक ग्रामस्थांना समाधानकारक भरपाई देण्याचाही विचार करू असे त्यांनी सांगितले.

सरकारला जमीन देण्यास विरोध का होतो, विचार करा – सचिन अहिर

शिवसेना आमदार सचिन अहिर यांनी यावेळी बोलताना, सरकारला जमीन देण्यास विरोध होतो, परंतु तिथे खासगी व्यक्ती आला तर त्याला जमीन दिली जाते. यामागचे कारण काय याचा विचार सरकारने केला पाहिजे, अशी सूचना मांडली. रिलायन्सने अशाच प्रकारे स्थानिकांच्या मागणीनुसार मोबदला देऊन साडेतीन हजार हेक्टर जमीन मिळवल्याचा दाखलाही त्यांनी दिला. स्थानिकांना विश्वासात घेऊन उद्योग आणण्याची जबाबदारी आहे तशीच ते टिकवण्याचीही जबाबदारी सरकारची आहे, असे अहिर यांनी सांगितले.