कोकणातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी; चिपळूण तहसीलदारांकडे शिवसेनेची मागणी

गेल्या महिनाभरात कोकणात झालेल्या सततच्या अवकाळी पावसामुळे भातशेती आणि नाचणी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे तहसीलदार चिपळूण तसेच तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देत शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनात कोकणातील सर्व शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे त्वरित करून सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची शेती उध्वस्त झाली असून भातशेती आणि नाचणीची पीकं पूर्णपणे वाया गेली आहेत. त्यामुळे त्यांना सरसकट नुकसानभरपाई मिळणे गरजेचे आहे, असे चिपळूण विधानसभा मतदालसंघाचे क्षेत्रप्रमुख बाळा कदम यांनी सांगितले. तालुकाप्रमुख बळीराम गुजर यांनी सांगितले की, गावोगावी पंचनामे करताना प्रत्येक गावाला एक अधिकारी किंवा शासकीय कर्मचारी नियुक्त करावा, जेणेकरून पंचनामे लवकर पूर्ण होतील आणि शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळेल. यावेळी झालेल्या चर्चेत विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव उर्फ बाळा कदम यांनी चिपळूण शहरातील शंकरवाडी, मुरादपूर, गोवळकोट, उक्ताड, खेंड परिसर, मतेवाडी शेतकरी उपस्थित होते.