
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सोनई येथे ज्येष्ठ नेते, माजी खासदार यशवंतराव गडाख यांची भेट घेऊन वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन केले. मी अभीष्टचिंतनासाठी तुमच्याकडे येणार आहे, असा शब्द दिला होता तो पूर्ण केला, असे सांगत यशवंतरावांसारखे लढवय्ये आमच्यासोबत आहेत. आमदार शंकरराव गडाख हेही लढवय्ये आहेत, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी गौरवोद्गार काढले. यावेळी सौ. रश्मी ठाकरे उपस्थित होत्या.
यशवंतराव गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त नगर जिह्यातील सोनई येथे घरगुती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे आणि सौ. रश्मी ठाकरे यांनी उपस्थित राहून यशवंतराव गडाख यांना शुभेच्छा देत त्यांचे अभीष्टचिंतन केले. यावेळी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, आमदार शंकरराव गडाख, विजय औटी, संपर्कप्रमुख बबनराव घोलप आदी उपस्थित होते.
गडाख यांच्या निवासस्थानी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि सौ. रश्मी ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी गडाख परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते. त्यानंतर उद्धव ठाकरे, यशवंतराव गडाख आणि शंकरराव गडाख यांच्यामध्ये चर्चा झाली.
जल्लोषात स्वागत
उद्धव ठाकरे आज नगर जिल्ह्याच्या दौऱयावर येणार असल्यामुळे सर्वत्र स्वागताचे फलक व कमानी लावण्यात आल्या होत्या. प्रत्येक ठिकाणी त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. शिर्डी विमानतळावर उद्धव ठाकरे यांचे आगमन होताच शिवसैनिकांनी ‘शिवसेना झिंदाबाद’च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.


























































