
केंद्र व राज्य सरकारच्या पोकळ व बोलघेवडय़ा योजनांची जनतेसमोर पोलखोल करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने शहरात सुरू असलेल्या ‘होऊ द्या चर्चा’ अभियानाला सर्वसामान्य नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यावेळी सर्वसामान्य जनताच या बोलघेवडय़ा सरकारला उखडून टाकणार असल्याचा विश्वास शहराध्यक्ष संभाजी कदम यांनी व्यक्त केला.
नुकतेच रेल्वे स्टेशन येथील इंगळे वस्तीमध्ये संभाजी कदम यांनी महिलांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना कदम म्हणाले, ‘अच्छे दिन’ची घोषणा करणाऱया भाजप सरकारने फक्त सर्वसामान्यांना महागाईने होरपळून ठेवले आहे. सुशिक्षित बेरोजगार युवकांचा प्रश्न सोडविण्याऐवजी खासगीकरण व कंत्राटीकरणाच्या निर्णयाने तरुणांचे भवितव्य धोक्यात आणले आहे. भाजप सरकारला ‘चले जाव’ म्हणण्याची वेळ आली आहे. सर्वसामान्य जनताच बोलघेवडय़ा सरकारला उखडून टाकणार आहे, असा विश्वास कदम यांनी व्यक्त केला.
सिलिंडरचा पूर्वीचा दर आणि आत्ताच्या दराची चर्चा करताना, महिलांनी संताप व्यक्त केला. भाजपने ‘अच्छे दिन’च्या नावाखाली जीवन जगणेच अवघड केले. फक्त घोषणा देण्याशिवाय कोणतेही काम भाजपने केले नसल्याची प्रतिक्रिया महिलांनी दिल्या. भाजपचा खोटारडेपणा व बोलघेवडय़ा योजनांचा पोलखोल करणाऱया पत्रकाचे उपस्थितांना वाटप करण्यात आले.
यावेळी महापौर रोहिणी शेंडगे, नगरसेवक प्रशांत गायकवाड, नगरसेविका सुवर्णा जाधव, विद्या खैरे, योगीराज गाडे, दीपक खैरे, संतोष ग्यानप्पा, गौरव ढोणे, डॉ. श्रीकांत चेमटे, आजिम शेख, अन्वर सय्यद, पप्पू लांडगे, संजय धीवर, विकी खराडे, राजेश मगर, उत्तम इजगत, बंटी खैरे, काका अवचर, संजय गायकवाड, विजया खराडे, शबाना शेख, वैशाली पारखे, मोनिका धीवर, पूजा सोनवणे, रेखा गायकवाड, सुनीता बंडगर, सुमय्या शेख, अलका यादव, हिराबाई धीवर, आफरीन शेख, अर्चना इजगज, भारती शेंगदाळे, रुपाली जगताप, शिरीन शेख आदींसह परिसरातील नागरिक व महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.
























































