तुमच्या फालतू कूटनीतीमुळेच जनता तुम्हाला कुटून खाणार आहे!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ठाण्यात गुरुवारी भाजप व मिंधे गटाचे मेळावे पार पडले. य़ावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबतची युती ही राजकीय असून ती एक कूटनीती असल्याचे म्हटले. त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका केली आहे. ”देवेंद्र फडणवीस तुम्ही वैफल्यग्रस्त अवस्थेत चुकीची विधानं करू नका, तुमचं हसं होतंय. तुमच्या फालतू कूटनीतीमुळेच जनता तुम्हाला कुटून खाणार आहे”, असे संजय राऊत यांनी सुनावले.

मुंबईमध्ये शुक्रवारी पत्रकारांशी राऊत यांनी म्हटले की, ”काल ठाणे जिल्ह्यात बाजुबाजुला दोन विनोदी शो पार पडले. यात फडणवीस यांनी म्हटले की, आम्ही राष्ट्रवादी सोबत गेलो हा अधर्म आहे. मात्र अधर्म असला तरी कुटनीती आहे. राजकारण आहे. मग जेव्हा आम्ही राष्ट्रवादी सोबत गेलो ते काय होतं. तुम्ही जाता ती कूटनीती, चाणक्यनीती, मग शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र आली हे काय होतं? आम्हाला कुटनीती जमत नाही का? तुम्ही चाणक्य आणि विदूराच्या पोटातून जन्म घेतला आहे का? तो तुमचा बाप आहे का? तुमच्या या फालतू कुटनीतीमुळे जनता तुम्हाला कुटून खाणार आहे.

राऊत यांनी पुढे म्हटले की, फडणवीसांनी वैफल्यग्रस्त अवस्थेत चुकीची विधानं करू नये, त्यामुळे त्यांचे हसं होत आहे. महाराष्ट्रात तुमच्या सारख्या बेईमांनाना लांब ठेवण्यासाठी महाविकास आघाडी स्थापन केली. आम्ही एकत्र आलो ती सुद्धा राज्याची गरज व कुटनीतीच होती. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांच्यावरही सडकून टीका केली. ते म्हणाले की, ”ठाण्यात झालेल्या फू बाय फूच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या समर्थकांना समजवायचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीसोबत गेलो कारण हे बेरजेचं राजकारण आहे. मग शिवसेना राष्ट्रवादीसोबत गेली ते कोणतं राजकारण होतं?

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी पुन्हा एकदा आपण किती खोटारडे आहोत ते दाखवून दिलं. आपण काल काय बोललो आज काय बोललो याचं त्यांना भान नाही त्यांना. कोणत्या नशेमध्ये आहेत. यांना कुणी भांग पाजली आहे? असा सवाल राऊत यांनी विचारला आहे. फडणीस खोटं बोलत आहेत, शिंदे मिंधे खोटं बोलत आहेत. अजित दादांना अजून कंठ फुटायचा आहे. आम्ही करतो ती कुटनीती आणि शिवसेनेने केलेला विश्वासघात, असं म्हणत ही लोकं शिवसेनेच्या बाबती धांदात खोटं बोलत आहेत. खरंतर फडणवीस आणि शिंदेनी केलेला विश्वाससघात महाराष्ट्राच्या काळजात घुसलाय, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

मणिपूर जळतंय आणि पंतप्रधान राफेलचा करार करतायत

दिल्लीमध्ये पुराने थैमान घातलं आहे. मणिपूरमधील असंतोष अजूनही धुमसतो आहे. असं असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सच्या दौऱ्यावर गेले आहेत. यावरून टीका करताना राऊत यांनी म्हटले की, एकीकडे दिल्लीला पूराचा वेढा आहे, मणिपूर जळतंय आणि दुसरीकडे प्रधानमंत्री फ्रान्समध्ये राफेलचा करार करतायत. का तर त्यांच्या काही लोकांना कमिशन मिळावं म्हणून. हजारो कोट्यवधीचा फायदा व्हावा म्हणून. ही हुकुमशाहीच आहे.

तुमच्या गळ्यातील गुलामीचा पट्टा बघा

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना अत्यंत खालची पातळी गाठली होती. आजारपणामुळे उद्धव ठाकरे यांना घालावा लागत असलेला गळ्यातील पट्ट्यावरून त्यांनी टीका केली होती. त्याला संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. ” उद्धव ठाकरे यांच्या गळ्यात मेडीकलचा पट्टा होता. तो उतरला. पण तुमच्या गळ्यात जो गुलामीचा पट्टा पडलाय तो बघा. आपल्या गळ्यातील गुलामीच्या पट्ट्याची तुम्ही काळजी करा. गुलामीचे पट्टे हे अशा अनेक कुत्र्यांच्या गळ्यात आहेत जे ऐशोआरामात राहतात, वैभवात राहतात. पण गळ्यात गुलामीचा पट्टा असतो”, असे संजय राऊत यांनी म्हटले.