
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवारी चंद्रपूर येथे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी झालेल्या प्रचारसभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. या प्रचारसभेत एकनाथ शिंदे यांनी चक्क भाजपचे कमळ चिन्ह असलेला शेला घातल्याचे दिसत आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जोरदार टीका केली आहे.
शिवसेनेने त्यांच्या अधिकृत एक्स पेजवर या सभेतील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत एकनाथ शिंदे यांच्या गळात भाजपचा शेला दिसून येत आहे. त्यावरून शिवसेनेने त्यांच्यावर हल्लाबोल केला. ”मुख्यमंत्री तोतया शिवसेनेचा, गळ्यात पट्टा भाजपाचा”, असा टोला शिवेसनेने लगावला आहे.
याच सभेत मुनगंटीवारांची जीभ घसरली
या सभेत मुनगंटीवार यांनी काँग्रेसवर टीका करताना असभ्य भाषेचा वापर केला, त्यामुळे उपस्थितांचे विशेषतः महिलांचे माना शरमेने झुकल्या. मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणात काँग्रेसवर टीका करताना भाऊ-बहिणींना गळफास लावणारा आणि एकाच बेडवर झोपवणारा पक्ष असे वर्णन केले.
सिंचन घोटाळाफेम अजितदादांचे कौतुक
चंद्रपुरातील प्रचारसभेत मोदींनी भ्रष्टाचारावर भाषण ठोकले. मात्र ज्यांच्यावर 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप केला त्या अजित पवारांचे मोदींनी या भाषणात तोंडभर कौतुक केले. या सभेत मोदींनी एककलमी कार्यक्रमाप्रमाणे महाविकास आघाडी सरकार आणि इंडिया आघाडीबद्दल पोटशूळ व्यक्त केला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेजारी बसलेल्या मिंधेंनी मंत्रिपद उबवले होते याचा सोयीस्कर विसर मोदींना पडला.

































































