तुमच्यासारखी धरणे भरण्यापेक्षा स्वयंपाक केलेला चांगला! उद्धव ठाकरेंनी काढली राष्ट्रवादीची सालटी

2543

महायुतीचे तुफान उसळले आहे. राज्यात सर्वत्र भगवे चैतन्य पसरले आहे. शिवसेना दिलेला शब्द पूर्ण करणारच! दहा रुपयात पोटभर जेवण देणार म्हणजे देणारच! पण हे दहा रुपयांत कसे जेवण देणार? यांना राज्य काय स्वयंपाक करण्यासाठी सोपवायचे काय? असे तारे राष्ट्रवादी काँग्रेसने तोडले आहेत. कशाला चिंता करता. दिलेला शब्द पाळण्यास आम्ही समर्थ आहोत. गोरगरिबांचे पोट भरण्यासाठी मी स्वयंपाक करायला तयार आहे. तुमच्यासारखी धरणे भरण्यापेक्षा स्वयंपाक करणे केव्हाही चांगले, अशा शेलक्या शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची सालटी काढली. आम्ही कधीही महाराष्ट्राच्या हिताआड येणार नाही. गेल्या पाच वर्षांत शिवसेनेने कधीही सरकारची अडवणूक केली नाही. पण शिवसेना हा गोरगरिबांचा, कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा बुलंद आवाज आहे. जे पटणार नाही, तेथे बोलणारच असेही उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.

शिवसेना-भाजप महायुतीचे धाराशिव येथील उमेदवार कैलास पाटील व परंडा येथील उमेदवार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या प्रचारासाठी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची दणदणीत सभा झाली. ऑक्टोबर हिट असल्यामुळे उन्हाचा पारा प्रचंड वाढलेला असून रणरणत्या उन्हात उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी भगवा जनसागरच उसळला होता. कालच शिवसेनेचा वचननामा मी जाहीर केला. दहा रुपयांत गरिबांना पोटभर जेवण देण्याचे वचन मी दिले आहे. होय, देणार म्हणजे देणारच! शिवसेना बोलेन ते करून दाखवतेच! पण काही जणांना त्यातही भ्रष्टाचार दिसतोय. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांना दहा रुपयांत जेवण कसे देणार याची चिंता लागलीय. अरे तुम्ही कशाला चिंता करताय. आम्ही समर्थ आहोत ना दिलेला शब्द पाळण्यासाठी. काय स्वयंपाक करण्यासाठी यांच्या हातात राज्य द्यायचे काय असेही पवार म्हणाले. मी स्वयंपाक केल्याने गरिबाचे पोट भरणार असेल तर मी आनंदाने स्वयंपाक करायला तयार आहे. तुमच्यासारखी धरणे भरण्यापेक्षा स्वयंपाक केलेला केव्हाही चांगला असा भीमटोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. यांचे उभे आयुष्य पाडापाडीत गेले. आताही म्हणे शरद पवार आमचे सरकार पाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. शरद पवार तुम्ही स्वस्थ बसूच नका. तुम्हाला आम्ही स्वस्थ बसू देणारही नाही. महायुतीचा आचारविचार एक आहे. हिंदुत्वाचा समविचार आहे. त्यामुळे हे सरकार पडणार नाही असेही त्यांनी बजावले.

धाराशिवमध्ये ‘भगवं वादळ’, उद्धव ठाकरेंची विराट सभा

उद्धव ठाकरे म्हणाले, लोकसभेला जनता जनार्दनाने आशीर्वाद दिला. दिल्लीत भगव्या विचारांचे सरकार आले. हे सरकार आणण्यात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा आहे हे विसरून चालणार नाही. दिल्लीतले सरकार काम करत आहे. जम्मू-कश्मिरातून कलम 370 हटवण्यात यावे ही शिवसेनाप्रमुखांची मागणी होती. सत्ता येताच कलम 370 चा नायनाट झाला. आम्हाला अभिमान आहे. कशाला चांगल्या कामात खोडा घालताय. दोन घास गरिबांच्या पोटात जात आहेत, त्याला आडवे याल तर शिवसेना खपवून घेणार नाही असा सणसणीत इशाराही त्यांनी यावेळी दिला.

जुन्या शिवसैनिकांचा मान राखणार
निवडणुकीच्या अगोदर वातावरण वेगळे होते. आपण अख्खा महाराष्ट्र लढवण्याची तयारी केली होती. परंतु युतीच्या वाटाघाटी झाल्या. महाराष्ट्राच्या हितासाठी काही कटु निर्णय घ्यावे लागले. हे निर्णय घेत असताना आपण आपल्या रक्तामांसाच्या माणसांवर अन्याय करत आहोत याची सल होती. परंतु इलाज नव्हता. मात्र निष्ठावान शिवसैनिकांनी मनाचा मोठेपणा दाखवला. हेच शिवसेनेचे वैभव आहे. यांना विसरून कसे चालेल? आपले सरकार येणारच आहे, तेव्हा या निष्ठावंतांचा मान राखला जाईल अशी ग्वाहीच यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिली.

माफी गुन्हेगारांना असते, शेतकरी गुन्हेगार नाही
शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या कर्जमाफीवर मी समाधानी नाही. माफी गुन्हेगारांना दिली जाते. आमचा पोशिंदा असलेला शेतकरी हा गुन्हेगार आहे का? महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे मी वचन दिले आहे. शेतकरी कर्जमुक्त म्हणजे कर्जमुक्तच झालेला मला पाहायचा आहे. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. पीकविम्याचा प्रश्न जरा जास्तच गंभीर आहे. पंतप्रधानांनी आणलेली योजना चांगली आहे. पण त्यात अनेक उणिवा आहेत. या त्रुटी आपल्याला दूर करायच्या आहेत. त्यासाठी आपण प्रयत्न करतो आहोत. पीकविमा देताना महसुल मंडळाचा विचार न करता गावाचा विचार केला पाहिजे. पण असे होत नाही. विमा कंपन्यांच्या झोळ्या भरण्यापेक्षा सत्ता आल्यावर मी स्वत:च राज्यसरकारकडे विमा कंपनी स्थापन करून त्यामाध्यमातून शेतकऱ्यांना मदत करण्यात यावी अशी मागणी करणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

आधे इधर जाओ, आधे उधर जाओ…
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात शरद पवार यांचा चांगलाच समाचार घेतला. शोले चित्रपटातील जेलरसारखी यांची अवस्था झाली आहे. तो जेलर सारखा म्हणत असतो, ‘आधे इधर जाओ, आधे उधर जाओ… बाकी मेरे पिछे आओ’ मागे वळून बघितले तर कोणीच नाही! शरद पवारांचे नेमके असेच झाले आहे असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

पुन्हा स्वाती पिटले नको…
शाळेला जाण्यासाठी पैसे नाहीत म्हणून स्वाती पिटले या विद्यार्थिनीने आत्महत्या केली. काळजाला घरे पाडणारी ही घटना. मी स्वत: त्यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी बोललो. आपण त्यावेळी विद्याथ्र्यांसाठी मोफत पासेसची योजना आणली होती. आताही शिवसेनेच्या वचननाम्यात विद्याथ्र्यांसाठी अनेक योजना आपण आणल्या आहेत. शिवसेनाप्रमुखांचा संस्कार घेऊन आपण पुढे जात आहोत. नवी पिढी घडवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले.

थोडे खड्डे विरोधकांसाठी ठेवणार
शिवसेनेने वचननाम्यात अनेक वचने दिली आहेत. दहा रुपयांत जेवण, एक रुपयात आरोग्य चाचणी, पाणी, रोजगार, रस्ते, शेतकऱ्यांच्या खात्यात दहा हजार रुपये… वॉटरग्रीडच्या माध्यमातून मराठवाडा सुजलाम सुफलाम करू. रस्त्यावरचे खड्डेही बुजवणार! थोडे खड्डे शिल्लक ठेवणार या विरोधकांना त्यात गाडण्यासाठी. निवडणूक म्हणजे बतावणी नाही. तुमचे आमचे, सर्वसामान्यांचे भविष्य ठरवणारी ही निवडणूक आहे. प्रचाराचा धुरळा उठला आहे. पण राहुल गांधी कुठे आहेत? यांना तुम्ही मते देणार का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी करताच जनसमुदायाने नाही नाही असा पुकारा केला.

मी मागच्या नाही समोरच्या दाराने येतो
केंद्रातल्या, राज्यातल्या सरकारने पाच वर्षात कामे केली. यामध्ये शिवसेनेचाही मोलाचा वाटा आहे. जनहिताच्या कामात शिवसेना कुठेही आडवी आली नाही. मुख्यमंत्र्यांनी स्वत: बोलावे, सांगावे… आम्ही सरकारची अडवणूक केली का? पण त्यावरही टीका. मी तुमच्यासारखा मागच्या दाराने येत नाही, छातीठोकपणे समोरच्या दाराने येतो! मागच्या वेळी निकाल लागताच न मागता पाठिंबा देणारे तुम्हीच होता ना! असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावताच टाळ्यांचा कडकडाट झाला. आणखी एक सांगतो, मागच्या पाच वर्षांत जे पटले नाही, रुचले नाही त्याविरोधात शिवसेनेने आवाज उठवला. आताही आपले सरकार येणार आहे. आम्हीही त्यात असणारच आहोत. पण जे पटणार नाही त्याविरोधात बोलणारच! कारण शिवसेना हा गोरगरिबांचा आवाज आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले.

अजित पवार महाराष्ट्राची माफी मागा
शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करणे ही चुकच होती अशी उपरती अजित पवारांना झाली आहे. मग त्यावेळी काय मती गुंग झाली होती का? शरद पवार मार्गदर्शक होते ना, त्यांनी का नाही सांगितले. एवढेच वाटते ना मग अजित पवार या चुकीबद्दल कबुली काय देता, महाराष्ट्राची माफी मागा! न्यायालयाने तुमच्या वंâबरड्यात हातोडा घातला नाहीतर मुंबई पेटली असती. अशा तिखट शब्दांत उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांची सालटी काढली. यांना म्हणे भावना आहेत. यांच्या डोळ्यात अश्रु येतात. शेतकऱ्यांचे अश्रु कधी दिसले नाहीत तुम्हाला? त्यांच्या भावना कधी कळल्या नाहीत! शेतकऱ्यांच्या भावना कळल्या असत्या तर सत्तेसाठी अशी वणवण करण्याची वेळ तुमच्यावर आली नसती असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणार
महाराष्ट्रातील 288 मतदारसंघात आता फक्त धनुष्यबाण आणि कमळ हेच दोन चिन्ह! तिसरे कोणतेही चिन्ह शिल्लक राहता कामा नये. आई जगदंबेच्या कृपेने महाराष्ट्रात भगव्याचे रान पेटले आहे. महायुतीची सत्ता येणारच आहे. विजयाची गुढी घेऊन मी स्वत: तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणार असे उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या धाराशिव येथे झालेल्या या सभेस शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, महायुतीचे उमेदवार कैलास पाटील, ज्ञानराज चौगुले, सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे, शंकरराव बोरकर, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, माजी आमदार दयानंद गायकवाड, विजयकुमार सस्ते, शिवाजी कापसे, सतीश सोमाणी, अभिजीत पाटील, भारत इंगळे, युवासेनेचे सुरज साळुंके, अक्षय ढोबळे, भाजपचे अ‍ॅड. मिलिंद पाटील, सतीश देशमुख, नितीन लांडगे, शिवसंग्रामचे अविनाश खापे पाटील, महिला आघाडीच्या श्यामल वडणे, कांचनमाला संगवे आदींची उपस्थिती होती. परंडा येथे भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुजीतसिंह ठाकूर, माजी आमदार पाशा पटेल, ज्ञानेश्वर पाटील, दिनकर माने, रिपाइंचे संजयकुमार बनसोडे, रासपचे बाळासाहेब पाटील हाडोंर्गीकर, बिभीषण खामकर, प्रशांत चेडे, संजय गाढवे, दत्ता साळुंके, सुभाषसिंह सिद्दीवाल, मेघराज पाटील, किरण सावंत आदींची उपस्थिती होती.

आपली प्रतिक्रिया द्या