Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील सर्व 48 जागा जिंकणार! उद्धव ठाकरे यांची भीमगर्जना

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी राज्यातील सर्व 48 जागा जिंकेल असा ठाम विश्वास आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला. महायुतीचा विनिंग रेट 45 प्लस असेल, तर महाविकास आघाडीचा 48 आहे. महायुतीचा 45 चा आकडा संपूर्ण देशाचा आहे, पण महाविकास आघाडीचा 48 चा आकडा महाराष्ट्राचा आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ही लढाई ‘हुकूमशाही विरुद्ध लोकशाही’ अशी होणार असून हुकूमशाहीला शिवसेनेने आव्हान दिलेय आणि ही हुकूमशाही हटवा, असे देशप्रेमी जनतेला आवाहन केलेय, असे ते म्हणाले.

एसटी बसेसवर धनुष्यबाणाच्या जाहिराती केल्या आहेत. मिंधे चोरीच्या मालावर श्रीमंती दाखवताहेत. मिंध्यांनी धनुष्यबाण चोरला, शिवसेनेचे नाव चोरले आणि शिवसेनाप्रमुखांचा पह्टोही वापरताहेत. कारण ते कर्तृत्वहीन, कर्तृत्वशून्य आहेत, पण चोर हा शेवटी चोरच असतो.

काँग्रेसचा जाहीरनामा हा मुस्लिम लीगचा असल्याचा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला होता. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इतिहासाचा दाखला देत मोदींवर तोफ डागली. ते म्हणाले की, संघाचा मुस्लिम लीगशी स्वातंत्र्यपूर्व काळापासून संबंध आहे. 1942 साली जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी काँग्रेस नको म्हणून त्या वेळी देशाची फाळणी मागणाऱया मुस्लिम लीगबरोबर पश्चिम बंगालमध्ये युती केली होती. म्हणून कदाचित मोदींच्या आठवणी ताज्या झाल्या असतील, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. सरसंघचालक मोहन भागवत हेसुद्धा मशिदीत गेल्याचे पह्टो आले होते आणि मोदीसुद्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये मंदिराच्या उद्घाटनाला गेले होते तेव्हा तेथील मशिदीमध्येही गेले होते याची आठवणही उद्धव ठाकरे यांनी करून दिली.

इलेक्टोरल बॉन्डमध्ये विरोधी पक्षांनाही निधी मिळाल्याच्या मोदींच्या टीकेचाही उद्धव ठाकरे यांनी या वेळी समाचार घेतला. विरोधी पक्षांनाही इलेक्टोरल बॉन्डमधून निधी मिळाला आहे, जे विरोध करताहेत त्यांना भविष्यात पश्चात्ताप होईल असे मोदी म्हणाले होते. मोदींच्या टीकेवरून त्यांची सत्ता पुन्हा येत नाही हे उघड झाले आहे, असे प्रत्युत्तर उद्धव ठाकरे यांनी दिले. सुप्रीम कोर्टामध्ये पर्दाफाश झाला नसता तर भाजपला हजारो कोटी रुपये कोणी दिले हे समजले नसते आणि ‘चंदा दो धंदा लो’ हे काम यापुढेही चालू राहिले असते, असेही ते म्हणाले.

आता गद्दारी झाली तर जनताच जागा दाखवेल

सांगली मतदारसंघात विशाल पाटील यांनी बंडखोरी करून अपक्ष लढण्याचा निर्णय घेतल्याच्या मुद्दय़ावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी, आता बंडखोरी, गद्दारी झाली तर जनताच त्यांना जागा दाखवेल, असा इशारा दिला. संपूर्ण देशात हुकूमशाहीविरुद्ध पक्के जनमत तयार झाले आहे. जनता फक्त मतदानाची वाट पाहत आहे. महाविकास आघाडीचे जागा वाटप जाहीररीत्या झाले आहे. कुठे बंडखोरी, गद्दारी होत असेल तर त्या त्या पक्षाची जबाबदारी आहे.

केजरीवाल, सोरेनना आज ना उद्या नक्की न्याय मिळेल

इंडिया आघाडीचे अनेक नेते राजकीय दबावापोटी ईडी प्रकरणात अद्याप तुरुंगात आहेत, त्यांच्याबद्दल आघाडीची पुढची भूमिका काय? असे उद्धव ठाकरे यांना या वेळी विचारले गेले. त्यावर ते म्हणाले की, न्यायालयाचा एक आसरा असतो. ती एक शक्ती आहे. कालच एकवीस न्यायमूर्तींनी सरन्यायाधीशांना सांगितले की, कोणत्याही दबावाला बळी न पडता निर्णय घ्या. कदाचित तो हाच दबाव असेल, पण सत्य आहे ते निर्भीडपणे स्वीकारून ‘सत्यमेव जयते’ या वाक्याला न्यायदेवता नक्कीच जागेल. आज ना उद्या न्याय मिळेल अशी खात्री आहे, नाहीतर दोन महिन्यांनंतर आमचे सरकार आल्यावर खरेखोटे काय असेल त्याचा निकाल लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

सर्व गुन्हेगार गुजरातमध्येच का पकडले जातात…

सलमानच्या घरावर गोळीबार करणारे गुजरातमध्ये पकडले गेले… या प्रश्नावर बोलताना, सर्व गुन्हेगार गुजरातमध्येच का पकडले जातात? असा प्रतिसवाल उद्धव ठाकरे यांनी केला. यामध्ये गुजरातची बदनामी होत आहे. शिवसेनेशी गद्दारी करणारेही गुजरातला पळाले होते. ड्रग्ज उतरले जातात तेसुद्धा गुजरातमध्ये. मी गुजरातला दोष देत नाही, पण आता गुजरातमधील लोकांनी याचा विचार करायला हवा, असे उद्धव ठाकरे म्हणाले. गुजरातमध्येही आता भाजपविरुद्ध आंदोलने होत असून लवकरच भाजप गुजरातमधूनही तडीपार होईल, असा भीमटोलाही त्यांनी लगावला.

याप्रसंगी शिवसेना नेते सुभाष देसाई, दिवाकर रावते, राजन विचारे, उपनेते विनोद घोसाळकर, विधिमंडळ गटनेते अजय चौधरी आदी उपस्थित होते.

बिनकामाची मते मागणाऱ्यांना प्रभू श्रीराम धडा शिकवतील

काँग्रेसचे अयोध्येतील राममंदिरासाठी योगदान नाही असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला होता. त्याबद्दल माध्यमांनी विचारले असता, ज्यांना आपल्या कामावर विश्वास नाही तेच आता प्रभू श्रीरामाच्या नावाने मते मागत आहेत, पण प्रभू श्रीराम ही एक शक्ती आहे आणि ते नक्कीच न्याय देतील, काहीच काम न करता मते मागणाऱयांना धडा शिकवतील, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

‘मोदी गेट’ हा शब्द भयंकर

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती परकला प्रभाकर यांनी इलेक्टोरल बॉन्ड म्हणजे ‘मोदी गेट’ आहे अशी टीका केली होती. ‘मोदी गेट’ हा शब्द ‘वॉटरगेट’ शब्दावरून रूढ झाला आहे. निक्सन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना त्यांचा घोटाळा बाहेर आला होता. त्याला ‘वॉटरगेट’ प्रकरण म्हटले जाते. तसाच ‘मोदी गेट’ हा शब्द भयंकर आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. इलेक्टोरल बॉन्डचे प्रकरण आधी का कळले नाही याचा निश्चितच विरोधी पक्षांना पश्चात्ताप आहे, अशी चपराकही उद्धव ठाकरे यांनी लगावली.

मशालीचे तेज घराघरात पोहोचेल – संजय राऊत

शिवसेनेच्या मशालीचे तेज आणि मशालीची आग लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या घराघरांत आणि कानाकोपऱयात पोहोचेल, असा विश्वास या वेळी शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. शिवसेनेचे चिन्ह नवीन आहे, पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हातातसुद्धा सर्वांनी मशाल पाहिली आहे. त्यामुळे मशाल शिवसेनेला आणि महाराष्ट्राला नवीन नाही, ‘शिवसेना गीता’च्या रूपाने ही मशाल अधिक तेजस्वी होईल, असे ते म्हणाले.

दोन महिने उरलेत, महाराष्ट्र फिरून घ्या!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रात येऊन महाविकास आघाडी आणि शिवसेनेवर सातत्याने टीका करत आहेत. त्याबाबत माध्यमांनी विचारले असता उद्धव ठाकरे यांनी जोरदार शब्दांत प्रहार केला. मोदी आणि शहांनी गेल्या दहा वर्षांमध्ये काहीच काम केले नाही. महाराष्ट्रावर आपत्ती आली तेव्हा हे दोघे आले नव्हते. आता त्यांच्या हातात दोन महिने सरकार आहे. फिरू दे त्यांना. महाराष्ट्र खूप चांगला आहे आणि महाराष्ट्राची जनता काय बोलते तेसुद्धा कळू दे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मशालीचे हेच चित्र प्रचारात वापरा

मशाल निशाणीचे अधिकृत चित्रही या वेळी उद्धव ठाकरे यांनी दाखवले. हे चित्र ईव्हीएम किंवा मतपत्रिकेवरचे चिन्ह आहे. शिवसैनिकांनीही मशालीचे चित्र बनवले होते, परंतु त्या चिन्हात आणि या अधिकृत चिन्हात गैरसमज होणार नाही याची काळजी घ्या. यापुढे मतदारांपुढे जाताना हे चित्र घेऊन जा. सर्व शिवसैनिक व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जिथे जिथे शिवसेनेचे उमेदवार आहेत तिथे हे अधिकृत चिन्ह वापरावे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

महाविकास आघाडीचा संयुक्त जाहीरनामा काढणार

महाविकास आघाडी प्रचाराच्या दृष्टिकोनातून सध्या जाहिरातींबाबत काम करत आहे. त्यानंतर संयुक्त सभा असतील आणि संयुक्त जाहीरनामाही असेल असे उद्धव ठाकरे यांनी या वेळी सांगितले. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यांनी देशासाठी जाहीरनामा तयार केला आहे. त्यात महाराष्ट्राच्या दृष्टीने काही गोष्टी आवश्यक असतील तर समाविष्ट केल्या जातील. त्यासंदर्भात घटक पक्षांशी चर्चा सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.

भाजप भ्रष्टांना खेचून घेणारा व्हॅक्यूम क्लीनर झालाय

देशातील 3 टक्के लोकच राजकारणात आहेत आणि त्यांच्यावरच ईडीच्या कारवाया झाल्या आहेत, असा दावा मोदींनी मुलाखतीमध्ये केला होता. त्यावर त्या 3 टक्क्यांपैकी किती टक्के लोक भाजपमध्ये घेतले? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी मोदींना केला. त्या 3 टक्क्यांपैकी कदाचित 100 टक्के लोक भाजपात असतील, एखाददुसरा मर्दासारखा हिंमतवाला लढतोय तो शिवसेनेत आहे, असेही ते छातीठोकपणे म्हणाले. भाजप हा आता व्हॅक्यूम क्लीनर झालाय, जो भ्रष्टाचाऱयांना खेचून आपल्याकडे घेतोय, असा घणाघात करतानाच, भ्रष्टांना स्वतःकडे घेऊन विरोधी पक्षांना भ्रष्टाचारमुक्त केल्याबद्दल भाजपचे आभार मानतो असे उद्धव ठाकरे म्हणाले