
सामना प्रतिनिधी । मुंबई
मुंबई पदवीधर मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार विलास पोतनीस यांचा उमेदवारी अर्ज बुधवारी कोकण भवन येथे दाखल करण्यात आला. यावेळी शिवसेना नेते एकनाथ शिंदे, शिवसेना सचिव अनिल देसाई आणि उपनेते माजी आमदार विनोद घोसाळकर उपस्थित होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई पदवीधर मतदारसंघातून विभागप्रमुख विलास पोतनीस यांची उमेदवारी जाहीर केली होती.
आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत हे मुंबई पदवीधर मतदारसंघातून दोन वेळा निवडून आले होते. त्यांचा कार्यकाळ आता संपत आहे. शिवसेनेचे पूर्णवेळ काम करण्याची संधी मिळावी म्हणून मला या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंती डॉ. सावंत यांनी गेल्या आठवडय़ात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटून केली होती. म्हणूनच मुंबई पदवीधर मतदारसंघातून विलास पोतनीस यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याचे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून कळवण्यात आले. शिक्षक व मुंबई पदवीधर मतदारसंघाची निवडणूक २५ जूनला होणार आहे.





























































