
सामना ऑनलाईन । मुंबई
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील ‘ठाकरे’ या चरित्रपटाची चर्चा सर्वत्र सुरू आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर आता चित्रपटाच्या रुपात पुन्हा एकदा साहेबांचा झंझावात अनुभवण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आता या उत्सुकतेत आणि आनंदात भर घालणारी एक बातमी आहे. चित्रपटगृहांमध्ये ठाकरेच्या स्क्रीनिंगवेळी प्रेक्षकांना सोबत शिव वडापावचा आस्वाद घेता येणार आहे.
ठाकरे या चित्रपटाच्या स्क्रीनिंगवेळी कार्निव्हल सिनेमाच्या 72 चित्रपटगृहांमध्ये खाद्यपदार्थांच्या यादीत शिव वडापावचा समावेश करण्यात येणार आहे. मराठी खाद्य संस्कृतीतलं मानाचं पान असलेल्या शिव वडापावला देशभरात पोहोचवण्यासाठी पॅन इंडिया सज्ज झालं आहे. यापूर्वी ठाकरे या चित्रपटाच्या ट्रेलर अनावरण सोहळ्यातही स्टार्टर म्हणून शिव वड्यांचा आस्वाद उपस्थितांनी घेतला होता. आता पुन्हा एकदा ही चटकदार आणि झणझणीत चव प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.
संजय राऊत प्रस्तुत, राऊटर्स एंटरटेनमेंट एलएलपी, वायकॉम १८ मोशन पिक्चर्स आणि कार्निवल मोशन पिक्चर्स निर्मित ‘ठाकरे’ येत्या 25 जानेवारी 2019रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या तर अभिनेत्री अमृता राव माँसाहेब मीनाताई ठाकरेंच्या प्रमुख भूमिकेत दिसून येणार आहे. चित्रपटाची निर्मिती शिवसेना नेते-खासदार संजय राऊत याची असून दिग्दर्शन अभिजित पानसे यांनी केलेले आहे.





























































