छत्रपती शिवरायांबाबत आक्षेपार्ह पोस्ट; कन्नडिगांविरोधात सीमा भागात संतप्त पडसाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बेळगावमधील मनगुत्ती, पिरनवाडी आदी गावांत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून फुटकळ कानडी संघटनांना हाताशी धरून जाणीवपूर्वक वाद निर्माण करण्याचे प्रकार समोर येत आहेत. अशातच आता सोशल मीडियातूनही छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल होऊ लागल्याने मराठी भाषिक सीमा भागात त्याचे संतप्त पडसाद उमटू लागले आहेत. शिवसेना आणि सकल मराठा समाजाच्या वतीने समाजकंटकांवर कारवाई करण्यासाठी आज मोर्चा काढण्यात आला.

काही दिवसांपूर्वी पिरनवाडी गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरच काही कानडी संघटनांनी रातोरात बेकायदेशीरपणे क्रांतिवीर रायण्णा यांचा पुतळा बसविला. गावात अन्यत्र कुठेही रायण्णा यांचा पुतळा सन्मानाने बसविण्यात यावा, असे स्थानिक मराठी भाषिकांकडून करण्यात येणारे आवाहनही कर्नाटक सरकारने धुडकावले.

सायबर सेल, आयुक्त कार्यालयावर धडक
छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात सोशल मीडियावर अवमानकारक लिखाण करणाऱ्या समाजकंटकाविरोधात कारवाई करा, या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले. सायबर सेल विभागाच्या कार्यालयासमोर मोर्चाने आलेल्या मराठी भाषिकांनी जोरदार घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले. यावेळी याप्रकरणी दोघांवर गुन्हे नोंदविल्याची माहिती दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. यानंतर हा मोर्चा पोलीस आयुक्त कार्यालयावर धडकला. पोलीस आयुक्त के. त्यागराजन यांनाही निवेदन देण्यात आले. सकल मराठा समाजाच्या वतीने अध्यक्ष प्रकाश मरगळे, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, श्री शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण गावडे, जयराज हलगेकर, गणेश दड्डीकर आदी मराठी भाषिक पदाधिकारी उपास्थित होते.