
कोरोनामुळे आई- वडील दोघेही मृत्यू पावले आहेत अशा 25 मुलांचे पालकत्व घेण्याची तयारी शिवनिकेतन ट्रस्टने दर्शविली आहे. यासंदर्भात ट्रस्टचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पत्र पाठवून परवानगी देण्याची विनंती केली आहे.
जगभरात कोरोना महामारीचे संकट अजूनच तीव्र होत आहे. समाजातील सर्व वर्गाला त्याचा फटका बसलेला आहे. महाराष्ट्रातील 2915 बालकांनी आपल्या पालकांना गमावल्याची दुर्दैवी बाब समोर आली आहे. ज्यांचे आई व वडील दोघेही कोरोनाचे बळी ठरलेले आहेत अशा बालकांच्या भविष्याचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. शिवनिकेतन ट्रस्टच्या माध्यमातून भारतीय सैनिकी विद्यालय, खडवली, ठाणे येथून ज्या 114 बालकांचे आई व वडील दोघेही मृत्यू पावले आहेत त्यापैकी 25 मुलांचे पालकत्व घेऊन त्यांना सहावी ते बारावीपर्यंतचे शिक्षण व पुढील शिक्षणाचा सर्व खर्च तसेच राहण्याचा व खाण्याचा खर्च पालकत्व स्वीकारून करण्यात येणार असल्याची माहिती जगन्नाथ शिंदे यांनी दिली.

























































