
सामना प्रतिनिधी । भुवनेश्वर
लोकसभा निवडणुकीत लोकांनी घराणेशाही नाकारून काँग्रेसचा पराभव केला, गांधी कुटुंबाला नाकारले, पण या पराभवातूनही काँग्रेसने काहीच धडा घेतलेला नाही. काँग्रेसला अजून सोनिया आणि राहुल गांधी हवे आहेत, अशी टीका मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली आहे. भाजप सदस्य नोंदणी मोहिमेसाठी चौहान ओदिशात आले असताना त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते.
काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत नवीन काँग्रेस अध्यक्ष म्हणून पुन्हा सोनिया गांधी यांच्याकडेच हंगामी पदभार सोपवण्यात आला. त्यावर बोलताना चौहान म्हणाले, ‘भाजपमध्ये घराणेशाहीची परंपरा नाही. पण काँग्रेस पक्षाला घराणेशाहीशिवाय दुसरी कोणतीही गोष्ट कळत नाही.’ लोकसभा निवडणुकीचा उल्लेख करत ‘लोकसभा निवडणुकीत ज्या ज्या ठिकाणी घराणेशाही होती तिथे काँग्रेसचा पराभव झाला. घराणेशाही, जातपात आणि कटुंबाची मक्तेदारी लोकांनी मोडून काढली. उत्तर प्रदेश, बिहारमधील घराणेशाहीला लोकांनी उखडून फेकून दिले.’


























































