मी बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक; उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही! बिरेन लिंबाचिया शिवसेनेशी एकनिष्ठ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
shivsena

मिंधे गटाची कारस्थाने सुरूच आहेत. यात एकनिष्ठ शिवसैनिकांबाबतही संभ्रम निर्माण करण्याच्या कुरापती केल्या जात आहेत. यात आपल्या बॅनरवर शिवसेनेतील निष्ठावंत शिवसैनिकांचे परस्पर फोटो लावून दिशाभूल केली जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. कडवट शिवसैनिक बिरेन लिंबाचिया यांनी याचा पर्दाफाश केला आहे. ‘मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ कदापि सोडणार नाही’, असे नमूद करत मिंधे गटाला चांगलेच खडे बोल बिरेन लिंबाचिया यांनी सुनावले आहेत.

बिरेन लिंबाचिया हे शिवसेना व्यापार विभागात सक्रिय आहेत. शिवसेना व्यापारी संघटना विभाग क्रमांक 1, 2, 3 चे ( दहिसर ते जोगेश्वरी) ते अध्यक्ष होते. कडवट शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे. असे असताना बिरेन लिंबाचिया हे शिंदे गटात गेल्याचा खोटा प्रचार करण्यात आला. त्यांचा फोटो लावून मिंधे गटाने दिशाभूल केली. ही बाब लक्षात येताच लिंबाचिया यांनी मिंधे गटाचा चांगलाच समाचार घेतला आहे. ‘मी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा निष्ठावंत शिवसैनिक आहे. मी आजही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे आणि यापुढे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याच पक्षात राहणार आहे,’ असे लिंबाचिया यांनी स्पष्ट केले आहे.