
सोलापूर जिल्ह्यात फुटीर आमदार तथा मंत्री तानाजी सावंत यांच्या दौऱ्याला शिवसैनिकांनी तीव्र विरोध करीत निषेध केला आहे. फुटीर आमदार सावंत ज्या मार्गावरून गेले, त्या मार्गावर शिवसैनिकांनी गोमूत्र शिंपडून रस्त्याचे शुद्धीकरण केले आहे, तर मोहोळमधील शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत मंत्री सावंतांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला.
आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे सोमवारी सोलापूर दौऱ्यावर होते. मात्र, त्यांचा दौरा जाहीर झाल्यापासूनच नातेपुते व माळशिरस तालुक्यात निषेध व्यक्त करत आंदोलन छेडण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी काही शिवसैनिकांना नोटिसा बजावल्या होत्या, तर पोलिसांनी दंडेलशाही करीत अमोल उराडे व रूपेश लाळगे या शिवसैनिकांना सावंत यांच्या दौऱ्यापूर्वीच स्थानबद्ध केले होते. नातेपुते येथील वातावरण तणावपूर्ण असतानाच मंत्री तानाजी सावंत यांनी घाईगडबडीत फलकाचे उद्घाटन व आढावा घेत कार्यक्रम आटोपता घेतला. यावेळी गर्दी जमविण्यासाठी बळाचा वापर करत आशा वर्कर व कर्मचाऱ्यांना हजर राहण्यासाठी फतवा काढण्यात आला होता. या दौऱ्यात नातेपुते शहरातून ज्या मार्गाने मंत्री तानाजी सावंत गेले, त्या मार्गावर शिवसैनिकांनी सावंतांच्या निषेधाच्या घोषणा देत रस्त्याचे शुद्धीकरण केले. नगरसेवक नंदकुमार लांडगे, संदीप लांडगे, किसन भगवान विटकर, नवनाथ राऊत आदी शिवसैनिक सहभागी झाले होते.
शिंदे समर्थकांची पोलिसांशी अरेरावी
सोलापुरात मुख्यमंत्री शिंदेंच्या समर्थकांनी अनधिकृत फलक काढल्याच्या कारणावरून रस्त्यावर पोलिसांशी अरेरावी करत पुन्हा एकदा मुजोरपणा केला आहे. मनीष काळजे व त्यांच्या काही साथीदारांनी रंगभवन परिसरात मंत्र्यांच्या स्वागतासाठी अनधिकृत फलक लावले होते. पोलिसांनी हे फलक काढताच काळजे याने महिला पोलिसांबरोबर अरेरावी केली. पोलिसांनी काढलेले फलक काळजे याने कार्यकर्त्यांना सांगून पुन्हा लावण्यास भाग पाडले. यापूर्वीही काळजे याने जिल्हा परिषदेसमोर पोलिसांशी अरेरावी केली होती. काळजेवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत.
मोहोळमध्ये जोरदार घोषणाबाजी
मोहोळमध्येही मंत्री तानाजी सावंत यांना तीव्र विरोध करण्यात आला. शिवसैनिक व युवासैनिकांनी रस्त्यावर उतरून जोरदार घोषणाबाजी केली. मंत्री सावंत यांची गाडी अडविण्याची तयारी शिवसैनिकांनी केली होती. आंदोलनकर्त्या शिवसैनिक व युवासैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या आंदोलनामुळे शहरातील वातावरण तणावपूर्ण बनले होते. ‘एकच साहेब उद्धवसाहेब’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.



























































