कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंना शिवसैनिकांनी दाखविले काळे झेंडे, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

मागील काही दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात प्रचंड नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी हिंगोली जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी न करताच वाशीमहून-नांदेडकडे जात असताना राष्ट्रीय महामार्गावरील कनेरगाव नाका येथे शिवसैनिकांनी कृषिमंत्र्यांचा ताफा अडवत त्यांना काळे झेंडे दाखविले. तसेच ओला दुष्काळ जाहीर करा अन् शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, अशी घोषणाबाजी करत महायुती सरकारचा निषेध करण्यात आला.

हिंगोली जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 2 लाख 71 हजार 586 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. जवळपास 85 टक्के क्षेत्र बाधित झाल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी हिंगोली व वसमत तालुक्यातील काही गावांमध्ये नुकसानीची केवळ ‘नजर पाहणीच’ केली.‌ तर कळमनुरी तालुक्यातील पिंपरी खु. व डोंगरकडा येथील नुकसानीचा पाहणी दौरा नियोजित असताना त्यांनी केवळ पुलावरूनच दूरदृष्टी टाकून नांदेडकडे निघून गेले. दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात ८५ टक्के क्षेत्र बाधित झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावून‌ नेला आहे. अशा परिस्थितीत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी हिंगोली जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना आधार देणे गरजेचे असताना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे आज शनिवारी हिंगोली जिल्ह्यातील नुकसानीकडे पाठ फिरवत वाशीमून नांदेडकडे राष्ट्रीय महामार्गाने जात होते. जिल्ह्यातील कनेरगाव नाका येथील महामार्गावर शिवसैनिकांनी दुपारच्या सुमारास कृषिमंत्र्यांचा ताफा अडवत त्यांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला. यावेळी ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा. यासह महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीच्या दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यात यावी,‌ अशी मागणी करत महायुती सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शेतकरी सेनेचे प्रदेश संघटक वसिम देशमुख, शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष गणेश गावंडे मानदार, शिवसेना उपतालुकाप्रमुख संदीप तनपुरे, डॉ. जुनेद देशमुख, इंजि. सद्दाम हुसेन, दिलशान पठाण, शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिकांसह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.