संजय राऊत यांच्यावरील कारवाईचे संसदेत पडसाद; दोन्ही सभागृहांत गदारोळ, कामकाज ठप्प

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
parliament

राजकीय सूडबुद्धीने शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईचे तीव्र पडसाद आज संसदेच्या दोन्ही सभागृहांत उमटले. दोन्ही सभागृहांत विरोधी पक्षांच्या सदस्यांनी राऊत यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज ठप्प झाले.

लोकसभेत कामकाज सुरू होताच सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करत या खेळाडूंच्या कामगिरीची माहिती सभागृहाला दिली. त्यानंतर लगेच विरोधी पक्षांच्या खासदारांनी खासदार संजय राऊत यांचा मुद्दा उपस्थित केला. शिवसेना खासदारांसह काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल यासह इतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनीही संजय राऊत यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ जोरदार घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यामुळे सभापतींनी कामकाज दुपारी बारा व त्यानंतरही याच मुद्दय़ावरून गदारोळ कायम राहिल्याने कामकाज दुपारी दोनपर्यंत तहकूब केले.

राज्यसभेतही संजय राऊत यांच्यावरील कारवाईचा मुद्दा गाजला. सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधी सदस्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. शिवसेना खासदार अनिल देसाई व प्रियंका चतुर्वेदी हे आक्रमक होते. या दोघांना सभागृहातील इतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी तितकीच तोलामोलाची साथ दिली. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही यावेळी सरकारवर जोरदार टीका केली. विपक्षमुक्त भारत हे सरकारचे उद्दिष्ट असून सरकारविरोधात आवाज उठविणाऱयांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. संजय राऊत हे सरकारविरोधात आवाज उठविण्यात आघाडीवर राहिले. त्यामुळेच ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने करण्यात आल्याची घणाघाती टीका त्यांनी केली.

मला जे सांगायचं आहे ते सांगून झालंय

खासदार संजय राऊत यांच्यावरील ईडीच्या कारवाईबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही प्रतिक्रिया दिली. याबाबतीत जे काही सांगायचं आहे ते सांगून झालं आहे, असे पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. संजय राऊत यांच्यावरील ईडीच्या कारवाईसंदर्भात शरद पवार यांनी यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन राजकीय आकसाने विरोधकांवर कारवाई नको अशी भूमिका मांडली होती. आज त्याच भूमिकेचा मोजक्या शब्दांत पवारांनी पुनरुच्चार केला.