राज्यात उध्दव ठाकरे, फडणवीस आणि मीच पैलवान – रामदास आठवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ramdas-athawale

राज्याच्या राजकारणात पूर्वी शरद पवार पैलवान होते. मात्र  आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी असे तिघेच ताकदीचे पैलवान असून यंदाची कुस्ती आम्हीच जिंकू असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खासदार गिरीष बापट यांच्यासह रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आठवले यांच्या पक्षाची भूमिका असलेला जाहीरनामा खासदार बापट यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला.

आठवले म्हणाले, “सध्या काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीकडे जाऊन उपयोग नाही. त्यांच्या पक्षातील लोकांना निवडून येण्याचा विश्वास नसल्याने अनेकजण पक्षांतर करुन भाजप, शिवसेनेत येत आहेत. शरद पवार एकेकाळी राज्यात पैलवान होते. मी स्वत: त्यांच्या तालमीत घडलो. सध्या राज्यात ते एकटेच खिंड लढवत आहेत. याबाबत त्यांचे कौतूक वाटते. मात्र, आताची परिस्थिती वेगळी आहे. राज्यात केवळ आम्ही तिघेच पैलवान असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यंदाची कुस्ती आम्हीच जिंकू असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

राज्यात महायुती 230 जागा जिंकेल

गेल्या पाच वर्षात सरकारने राज्यात विकासकामे केली आहेत. येत्या निवडणूकीत शिवसेना 100, भाजप 130 आणि घटकपक्ष मिळून राज्यात महायुती 230 ते 240 जागा जिंकेल. तर, महाआघाडीला 2014 पेक्षाही कमी जागा मिळतील. येत्या निवडणूकीनंतर केंद्राप्रमाणेच राज्यातही काँग्रेस आघाडीला विरोधी पक्षनेते पद मिळणार नाही, असेही आठवले यांनी यावेळी सांगितले.