
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उद्या गुरुवारी मीरा-भाईंदरच्या दौऱ्यावर आहेत. वालचंद हाईट्स येथे करण्यात आलेल्या जैन मंदिराच्या जीर्णोद्धारानिमित्ताने अंजन शलाका महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवास उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असून जैनमुनींचे आशीर्वादही घेणार आहेत.
गुरुवारी सकाळी 11 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जैन मंदिराला भेट देणार आहेत. या वेळी त्यांच्या हस्ते पूजाही करण्यात येणार आहे. नव्याने बांधलेल्या जैन मंदिरात अंजन शलाका प्रतिष्ठा महोत्सव होत असून जैन मुनी आचार्य भगवंत यशोवर्म सुरीश्वरजी महाराज यांची भेट उद्धव ठाकरे घेणार आहेत. या वेळी शिवसेनेचे खासदार राजन विचारे, खासदार विनायक राऊत, जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे हेदेखील उपस्थित राहणार आहेत. दिवसभर जैन मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनदेखील करण्यात आले आहे.
































































