
शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दसरा मेळाव्यात, सभांमध्ये, आंदोलनात दिसणारा तोच जोश आणि तोच उत्साह आजही डोक्यावर वरुणराजा बरसत असताना दिसला. ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो’, ‘अरे मुंबई आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’ अशा गगनभेदी घोषणांनी आज मरीन लाइन्स येथील मेट्रो परिसर दणाणला. मेट्रो चौकात येणारे सर्वच रस्ते भगवा हातात घेतलेल्या शिवसैनिकांनी आणि रणरागिणींनी ओसंडून वाहत होते. मेट्रो सिनेमा ते महापालिका कार्यालय परिसरात शिवसैनिकांची अलोट गर्दी उसळली होती. निमित्त होते, शिवसेनेने महापालिकेवर काढलेल्या विराट मोर्चाचे.
मुंबई महापालिकेत गेल्या वर्षभरापासून मिंधे सरकारच्या आशीर्वादाने पैशाची उधळपट्टी, भ्रष्टाचार सुरू आहे. त्याचा जाब विचारण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज पालिकेवर जबरदस्त मोर्चा काढण्यात आला. मुंबईत सकाळपासूनच पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असतानाही त्याची तमा न बाळगता शिवसैनिक हातात डौलाने भगवा फडकवत मुंबईच्या कानाकोपऱयातून मिळेल त्या वाहनाने, लोकल ट्रेनने मरीन लाइन्सच्या मेट्रो चौकात दाखल होत होते. त्यामुळे परिसरात भगवा माहोल उसळला होता. कोसळणाऱया वरुणराजापुढेही शिवसैनिक मागे हटत नसल्याने हातात भगवा घेऊन मोठय़ा निर्धाराने उभा ठाकल्याने वरुणराजानेच अखेर काहीशी उसंत घेतली. त्यामुळे मेट्रो सिनेमा ते महापालिका कार्यालय असा अलोट गर्दीचा दणदणीत मोर्चा पार पडला.
मुंबईकरांच्या पैशाला हात लावाल तर याद राखा!
1997 मध्ये शिवसेना सत्तेवर आली असताना पालिका 600 कोटी नुकसानीत होती, मात्र शिवसेनेच्या कार्यकाळात पालिकेच्या ठेवी 90 हजार कोटींवर गेल्या. विशेष म्हणजे हे करताना कोणताही विकास थांबला नाही. 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना करमाफीसारखे निर्णय घेऊन राबवण्यात आले. असे असताना आता मिंधे आणि भाजपचा पालिकेच्या ठेवींवर डोळा आहे. मात्र मुंबईकरांच्या पैशाला हात लावाल तर याद राखा, असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी दिला.
तुमच्या फाईल तयार आहेत
स्ट्रीट फर्निचर उपक्रमात एकाच कंत्राटदाराला तब्बल 13 कामे करता यावीत अशी अट जाणीवपूर्वक घालून मर्जीतल्या कंत्राटदाराला काम देण्यात आल्याचा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला. याबाबत पालिकेकडे उत्तर मागितले असता एकाच उपायुक्तांनी मला आणि आमदार रईस शेख यांना वेगवेगळी उत्तरे दिली.
घोटाळय़ांच्या चौकशीसाठी नेमली जाणारी ‘फॅक्ट फाइंड कमिटी नेमलेलीच नाही. या सर्व प्रकारांच्या फाईल तयार आहेत. आमचे सरकार आल्यावर या सर्वांची चौकशी होईल. दोषींना त्यांची जागा दाखवली जाईल, असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी दिला.
नगरसेवकांच्या माध्यमातून होणारी कामे नगरसेवक नसताना प्रशासक मिंध्यांसाठी वेगाने करीत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. मुंबईतील रस्त्यांच्या कामांसाठी लागणाऱया खडीचे कंत्राट आपल्या मित्राला देण्यासाठी मिंध्यांनी रस्त्याची कामे थांबवल्याचेही त्यांनी उघड केले.
तेव्हा भ्रष्टाचार दिसला नाही का?
मुंबईकरांचा विश्वास असल्यामुळेच गेल्या 25 वर्षांपासून पालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकत आहे. पालिकेच्या माध्यमातून 45 हजार कोटींचा अर्थसंकल्प मांडून विकासाची कामे केली जात आहेत. तेव्हा शिवसेनेसोबत भाजपही सत्तेत होती. त्यावेळी त्यांना भ्रष्टाचार दिसला नाही का, असा सडेतोड सवाल शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी भाजपला केला. सध्या सौंदर्यीकरणाच्या नावाखाली मुंबईकरांना चुना लावण्याचे काम सुरू असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
गेल्या वर्षभरापासून ईडी सरकारने प्रशासनाच्या माध्यमातून केलेल्या प्रचंड भ्रष्टाचाराला वाचा पह्डण्यासाठीच हा मोर्चा असल्याचे ते म्हणाले. मागील एका वर्षात ईडी सरकारने ठेकेदारांचे खिसे भरण्याचे काम केले. त्यामुळे ‘चोर मचाये शोर नव्हे’ तर ‘चोराच्या उलटय़ा बोंबा’ अशी भाजपची स्थिती असल्याचे प्रभू म्हणाले. पालिका 45 हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्पातून 28 हजार कोटी विकासाच्या कामांसाठी खर्च होतात. नागरी सुविधा दिल्या जातात. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पालिकेने ‘आपले कुटुंब, आपली जबाबदारी’ अशा उपक्रमातून मुंबई वाचवल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आत्ता निवडणुका घ्या, चोर कोण-मोर कोण कळेल!
मुंबई शिवसेनेची आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामुळे महापालिकेवर गेल्या 25 वर्षांपासून भगवा डौलाने फडकत आहे. असे असताना नगरसेवक नसल्याने गेल्या वर्षभरापासून पालिकेत प्रचंड घोटाळे, भ्रष्टाचार सुरू आहे. याविरोधात शिवसेना मोर्चा काढत असताना भाजपकडून ‘चोर मचाये शोर’ असे बोलले जात आहे. मात्र त्यांना आमचे आव्हान आहे की, तुम्ही आत्ता निवडणुका घ्या, म्हणजे चोर कोण आणि मोर कोण, हे समजेल, असा घणाघात शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी केला.
आदित्य ठाकरे महाराष्ट्रच नव्हे तर देशाचे तरुण नेतृत्व आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली महापालिकेवर मोर्चा धडकला आहे. आता सूर्य उगवला आहे, असा इशाराही त्यांनी यावेळी विरोधकांना दिला. पावसाळा असल्याने सगळय़ांना चिंता होती की धो धो पाऊस पाडेल, पण पाऊस पडला तो शिवसैनिकांचा. सूर्याचा प्रकाशही पडला. आम्हाला तेहतीस कोटी देवदेवतांचे आशीर्वाद मिळाले, असे संजय राऊत म्हणाले. बजरंग बली मोदींना कर्नाटकात पावला नाही, मात्र तो आम्हाला पावला आहे. आता हिंदुत्वाची गदा फिरवल्यावर चोरावरचे मोर कायमचे बिळात जातील. 2024 मध्ये पालिकेवर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. महापालिकेवरील शिवसेनेचा भगवा उतरवण्यासाठी दिल्लीतील दोन बोके आणि महाराष्ट्रातील चाळीस खोके कारस्थान करीत आहेत. हे कारस्थान मोडून काढण्यासाठी हा मोर्चा असल्याचेही त्यांनी सांगितले. भाजप-मिंध्यांची एकच इच्छा आहे की, आमच्या पक्षात या आणि स्वाभिमानाने भ्रष्टाचार करा, असा टोलाही त्यांनी लगावला.
आदेश ठोसानी दुबईवरून थेट मुंबईत
आदेश ठोसानी नावाच्या युवासेनेच्या कार्यकर्त्याने आदित्य ठाकरेंच्या आदेशानंतर थेट दुबईवरून मुंबई गाठली. याबाबत आदेश ठोसानी याला विचारले असता तो म्हणाला की, आमच्यासाठी ठाकरे परिवार हा श्रद्धेचा विषय आहे. त्यांचा आदेश आल्यावर आम्ही जगात कुठेही असलो तरी पोहचणे हे कर्तव्य आहे. तसेच दुबई येथे उद्धवसाहेबांवर प्रेम करणारे हजारे लोक असल्याचेही आदेश म्हणाला.
अखेर ती इच्छा आदित्य ठाकरेंनी केली पूर्ण!!!
आदेश हा कडवट युवासैनिक असल्याने आयुष्यात एकदा तरी ज्यांना तो प्रेरणास्थान मानतो त्या आदित्य ठाकरेंना भेटण्याची त्याची तीव्र इच्छा होती. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना ही गोष्ट समजताच त्यांनी थेट आदेशला थेट ‘मातोश्री’वर बोलावून त्याची ही इच्छा पूर्ण केली. आदित्य ठाकरेंची भेट झाल्यानंतर प्रचंड आनंदित झालेल्या आदेशचे डोळे पाणावले.
पावसातही शिवसैनिकांच्या शिस्तीचे दर्शन
पालिकेवर काढण्यात येणाऱया मोर्चाची सुरुवात मरीन लाइन्स येथील मेट्रो सिनोमा येथून दुपारी साडेचारच्या सुमारास झाली. त्यासाठी दुपारपासूनच शिवसैनिक मोठय़ा संख्येने मेट्रो चौकात दाखल होत होते. त्यामुळे परिसरात मोठी गर्दी झाली होती. यावेळी शिवसैनिकांच्या शिस्तीचे दर्शन घडले. मेट्रो चौकातील वाहतुकीला कोणताही अडथळा येऊ नये म्हणून शिवसैनिक स्वतः पोलिसांच्या मदतीने वाहनांना रस्ता मोकळा करून देत होते.
मुंबईच्या कानाकोपऱयातून आलेल्या शिवसैनिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून शिवसेनेने ठिकठिकाणी बाटलीबंद पाण्याची व्यवस्था केली होती. तसेच पाणी प्यायल्यानंतर शिवसैनिक सदरची बाटली रस्त्यावर इतस्ततः न टाकता स्वयंसेवकांच्या हाती सोपवत होते.
लक्षवेधी घोषणा
आवाज कुणाचा, शिवसेनेचा
कोण आले रे, कोण आले, शिवसेनेचे वाघ आले
मुंबईकरांची तिजोरी रिकामी करणाऱया प्रशासक आणि घटनाबाह्य सरकारचा निषेध असो
चाळीस बोके, पन्नास खोके, मुंबईसाठी नॉट ओके
मुंबईची तिजोरी लुटतंय कोण, दिल्लीश्वरांचे चमचे दोन
आलाय यांना सत्तेचा माज, खोके सरकार घोटाळेबाज
घोटाळे करून केली मुंबईची हालत, म्हणे पावसाचे करा स्वागत
कसली रोषणाई, कसले सुशोभिकरण, विकासाच्या नावाखाली नुसते विद्रुपीकरण
तोडून एफडी मुंबईची, करतायत चाकरी दिल्लीची






























































