स्वबळावर लढायचं आणि जिंकायचं! आदित्य ठाकरे यांचे खणखणीत उद्गार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

शिवसेनेने आतापर्यंत स्वतःची ताकद कधी पाहिलीच नाही. युतीच्या माध्यमातून जेवढं काही मिळत राहिलं त्यातच लढलो आणि जिंकत राहिलो. पण आता तसं चालणार नाही. स्वबळावर लढण्याबाबतचा ठराव सहा महिन्यांपूर्वीच शिवसेनेने केला आहे. त्यामुळे आता स्वबळावर लढायचं आणि स्वबळावरच जिंकायचं, अशी गर्जना आज शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली. त्यांनी स्वबळाच्या नाऱयाचा पुनरुच्चार करताच ‘शिवसेना झिंदाबाद, आदित्य ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है’च्या घोषणांनी सभागृह दणाणून गेले.

शिवसेनेच्या लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱयांच्या महाराष्ट्रव्यापी शिबिराचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले त्याप्रसंगी ते बोलत होते. सध्या राज्यात आणि देशात कधीही निवडणुका लागतील अशी परिस्थिती आहे. त्यामुळे तयारीला लागा. आपल्याला महाराष्ट्रातच नाही तर देशात भगवा फडकवायचा आहे. तशी शपथ मी घेतली असून कामाला लागलो आहे. तुम्हीही मोठय़ा निर्धाराने कामाला लागा, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले.

नुसती मतं नाही तर लोकांची मनं जिंका

शिवसैनिक नेहमीच जनतेच्या सेवेसाठी पुढे असतो. कोणतेही संकट असो मग तो बॉम्बस्फोट असो की पूर असो. शिवसैनिक रक्तदानासाठी नेहमीच पुढे असतो. जनसेवा करताना नुसती मतं नाही तर लोकांची मनं जिंका, असे आवाहनही आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले.

वर्धापनदिन आपल्यासाठी जन्मदिवस

सर्वसामान्य तरुणांचे, भूमिपुत्रांचे प्रश्न तडीस लावण्यासाठी ५२ वर्षांपूर्वी शिवसेनेचा जन्म झाला. त्यामुळे शिवसेनेचा वर्धापनदिन आपल्या सर्वांसाठी जन्मदिनच असल्याचे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. तसेच एवढय़ा मोठय़ा पक्षाच्या महाशिबिराचे उद्घाटन करण्याची संधी मला दिली हा माझा सन्मान असल्याचेही ते म्हणाले.

५२ वर्षांची वाटचाल स्वतःच्या हिमतीवर

कोणाच्याही कुबडय़ा न घेता शिवसेनेने स्वतःच्या हिमतीवर ५२ वर्षांची वाटचाल केली. या वाटचालीत सर्वांनीच मेहनत घेतल्याने इथपर्यंत पोहोचलो आहोत. ही अभिमानाची बाब असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. तसेच शिवसेनाप्रमुखांनी ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हा मंत्र दिला आहे. पण आज शिवसेना १५० टक्के समाजकारण करत आहे. एवढे काम कोणताच पक्ष करत नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

वय वाढलं तरी मनानं थकू नका

वय वाढलं तरी मनानं थकू नका हा विचार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिल्याचे सांगत आता आपण थांबून चालणार नाही. मनाने थकलो तर काहीच होणार नाही, असेही आदित्य ठाकरे यांनी बजावले. तसेच शिवसेनाप्रमुखांनी शिवसेनेची स्थापना केली नसती तर आज आपल्याला सत्तेत राहून सरकारवर अंकुश ठेवता आला नसता, असेही त्यांनी सांगितले.

पालघरमध्ये शिवसेनेचाच नैतिक विजय

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत अनेकांना वाटत होते की आपण उमेदवार मागे घेऊ, पण आपण जोमाने लढलो असून शिवसेनेच्या उमेदवाराला भरघोस मतं मिळाली आहेत. कागदावर इतरांचा विजय झाला असला तरी तो चिटिंग करून मिळाला आहे. खरा नैतिक विजय शिवसेनेनेच मिळवला असल्याचे आदित्य ठाकरे यांनी ठामपणे सांगितले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महत्त्वाच्या

लोकसभा आणि विधानसभेबरोबरच विधान परिषदेतही बहुमत असणे गरजेचे आहे. ते असेल तरच काम करता येते. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महत्त्वाच्या असून नुकत्याच झालेल्या निवडणुकीत तीनपैकी दोन जागा शिवसेनेने जिंकल्या आहेत. तर आता होऊ घातलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकाही निश्चित जिंकू, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

शिवसेनाप्रमुखांचा आदेश कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत घुमायचा

शिवसेनाप्रमुख हे देशातील एकमेव नेते होते, ज्यांचा आदेश कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत घुमत असे. त्यांनी नेहमीच राष्ट्रहित पाहिले. कश्मिरी पंडित जेव्हा संकटात होते तेव्हा शिवसेनाप्रमुखांनीच आश्रय आणि संरक्षण दिले होते. बंद झालेली अमरनाथ यात्राही शिवसेनाप्रमुखांच्याच आदेशाने सुरू झाली होती, अशी आठवण आदित्य ठाकरे यांनी करून दिली.

उद्धवजी लढतात-झगडतात; इतरांना शक्य नाही

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नेहमी सर्वसामान्यांसाठी, शेतकऱयांसाठी लढतात-झगडतात. ते करीत असलेले काम इतरांना शक्य नाही. शेतकऱयांच्या मुलांचा सामुदायिक विवाह सोहळा केला. दोन वर्षांत  २५ कोटी रुपयांच्या योजना शेतकऱयांसाठी खुल्या केल्या. त्याकरिता आवश्यक असलेला ६० लाख रुपयांचा निधी त्यांनी आपल्या फोटोग्राफीचे प्रदर्शन भरवून जमवल्याचेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.