मुंबई महापालिकेवर उद्या शिवसेनेचा महामोर्चा; आदित्य ठाकरे करणार नेतृत्व

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुठून सुरू होणारः मेट्रो सिनेमा, मरीन लाइन्स

वेळः सायं. 4 वा.

आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या मोर्चात मुंबईकर नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. आज त्यांनी ट्विटरवरही मोर्चासंदर्भात पोस्ट केली.

मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पण मुंबईकरांना प्रतीक्षा आहे ती शनिवार, 1 जुलैची. मुंबईची वाट लावू पाहणाऱ्यांना जाब विचारण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या विराट मोर्चाची. ऊन असो वा पाऊस, मोर्चा निघणारच असा निर्धार शिवसेना आणि शिवसैनिकांनी केला आहे. मरिन लाईन्सच्या मेट्रो सिनेमा येथून सायंकाळी 4 वाजता मोर्चाला सुरुवात होऊन तो महापालिका मुख्यालयावर धडकणार आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे हे या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत.

    गेल्या अनेक दिवसांपासून या मोर्चाची जोरदार तयारी सुरू आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे सातत्याने पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. शिवसेनेच्या शाखा-शाखांमधूनही बैठका सुरू आहेत. शिवसेना संलग्न संघटनांचे पदाधिकारीही मोर्चाची तयारी करत आहेत.

शनिवारी होणाऱ्या मोर्चासाठी मुंबईच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्यने शिवसैनिक आणि नागरिक मेट्रो सिनेमाकडे पोहोचणार आहेत. त्यामुळे होणारी गर्दी लक्षात घेऊन शिवसैनिकांनी खासगी वाहनांऐवजी लोकल रेल्वेने छत्रपती शिवाजी टर्मिनस किंवा चर्चगेटपर्यंत पोहोचून मेट्रो सिनेमाकडे दाखल व्हावे, असे आवाहन विभाग पातळीवर करण्यात आले आहे.

ऊन असो वा पाऊस असो…

आदित्य ठाकरे यांनीही शिवसेनेच्या मोर्चात मुंबईकर नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. आज त्यांनी ट्विटरवरही मोर्चासंदर्भात पोस्ट केली. ‘ऊन असो वा पाऊस, मुंबईकरांच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या खोके सरकारविरुध्द मुंबईकरांचा धडक मोर्चा निघणारच’ असे त्यांनी नमूद केले आहे. 1 जुलैला मुंबईकर रस्त्यावर उतरून मुंबई महानगरपालिकेवर धडक देणार, असेही त्यांनी म्हटले आहे.