उमेदवाराला लाखांवर मतांनी निवडून आणूच! शिवसैनिकांचा निर्धार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उमेदवार कुणीही असो, ‘शिवसेना’ ही चार अक्षरे आणि ‘धनुष्यबाण’ ही निशाणी लक्षात ठेवून लाखांवर मतांनी त्याला निवडून आणायचेच असा निर्धार शिवडी विधानसभेतील शिवसैनिकांनी आज केला. शिवसेना शिवडी विधानसभेचा विजय संकल्प मेळावा शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आज परळ येथील दामोदर हॉलमध्ये हाऊसफुल्ल गर्दीत झाला.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवडी विधानसभेतील शिवसैनिक सज्ज झाले आहेत. त्यासाठी दक्षिण मुंबई विभागाच्या वतीने निरीक्षकांचीही नेमणूक करण्यात आली आहे. शिवडी विधानसभा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. इथे शिवसेनेचा उमेदवार विजयी होणार अशी खात्रीच असून शिवडीसह महाराष्ट्र भगवा होईल असा विश्वासही यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

शिवसेनेचे हृदयस्थान असलेल्या परळ-लालबागमध्ये मोडणार्‍या शिवडी विधानसभेत शिवसेनेने केलेल्या कामाची पावती पुन्हा एकदा मतदार विजयाच्या रुपात देतील याबद्दल वादच नाही असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी व्यासपीठावर शिवसेना सचिव सूरज चव्हाण, माजी महापौर श्रद्धा जाधव, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सुनील (बाळा) कदम, विधानसभा संघटक सुधीर साळवी, उपविभागप्रमुख गजानन चव्हाण यांच्यासह विभागातील नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते. शिवडी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी यावेळी शिवसेनेत प्रवेश केला.

आपला उमेदवार एकच…धनुष्यबाण!

आगामी निवडणुकीनंतर महाराष्ट्राचा रंग भगवाच असेल असा निर्धार करा असे आवाहन यावेळी आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले. आपला उमेदवार आणि निशाणी एकच…धनुष्यबाण! असे सांगतानाच नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी तुमची ताकद आणि आशीर्वाद द्या असे ते म्हणाले. वरळीतून लढणार की शिवडीतून  अशा चर्चेवर त्यांनी, पेपर आताच फोडणार नाही असे सांगितले. त्यावर पत्रकारांनी ‘परीक्षा कुठून देणार, असा प्रश्न विचारला असता आदित्य ठाकरे यांनी सेंटर ठरलेले नाही असे मिश्कील उत्तर दिले. ‘