
शिवसेना आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूण शहरातील पाग येथील घरावर मंगळवारी रात्री हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे. घरासमोरील अंगणात क्रिकेटमधील स्टंप, पेट्रोलच्या बॉटल्स व दगड आढळल्याने खळबळ उडाली आहे. आमदार भास्कर जाधव हे त्यावेळी घरी नव्हते सध्या ते मुंबईमध्ये आहेत.
नुकतीच चिपळूण येथे नीलेश राणे यांनी भाजपच्या चिपळूण शहर कार्यकर्ता संवाद मेळाव्यात आमदार जाधव यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या टीकेला जाधव यांनी काल कुडाळ येथील सभेत जोरदार प्रत्युत्तर देत राणे पिता-पुत्रांवर टीकास्त्र सोडले. त्यानंतर मध्यरात्री अज्ञाताकडून आमदार जाधव यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा संशय आहे. सध्या घटनास्थळी चिपळूण पोलीस दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत.































































