
40 लोक गुवाहाटीत बसून मौजमजा करत आहेत, ती जिंवत प्रेते आहेत. ते खातात, पितात, मौजमजा करतात. मात्र, त्यांचे जीवन जिवंत प्रेतासारखे आहे. ते येथे येतील, तेव्हा त्यांचा आत्मा इथे नसेल, त्यामुळे ती जिवंत प्रेते असतील, अशी त्यांची परिस्थिती आहे, असे आपण म्हणालो आहोत, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सांगितले. त्यांचे शवविच्छेदन फ्लोअर टेस्टवेळी विधानसभेत होईल, असेही ते म्हणाले. या वाक्यात काहाही वादग्रस्त नसून भाजपवाले हे वादग्रस्त बनवत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आपले भाषण नीट समजून घ्या, असे ते म्हणाले.
सुनील राऊत बंडखोरांच्या संपर्कात असल्याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले की, सुनील राऊत यांची कांजूरमार्गमध्ये सभा सुरू आहे. आपण किंवा आपले कुटुंब मरायला तयार आहोत, पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आमचा आत्मा आहे. शिवसेना कधीही सोडणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. ज्यांना बोलायचे आहे, त्यांना बोलू द्या. जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत, अखेरच्या श्वासापर्यंत आपण शिवसेनेसोबत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सूरतला काय जादूटोणा आहे ते बघावे लागेल, काही आमदार सूरतमार्गे का गेले, तिथे कोणाचे पाय पकडावे लागतातस कोणापुढे गुडघे टेकावे लागतात, कोणासमोर नाक घासावे लागते, तिथून फाटकी नोट घेऊन कुठे जावे लागते. हे सगळे हिशोब, व्यवहार आहेत. मंत्रीपद द्यायचे की नाही, घ्यायचे की नाही, हे सर्व सूरतमध्ये ठरत आहे. एवढी गुलामी महाराष्ट्राच्या आमदारांनी करताना आपण कधी पाहिले नाही. ब्रिटिशांच्या काळात छत्रपती शिवाजी महराजांनी लुटली होती. तिथे जाऊन हे लाक गुडगे टेकतात. त्यांना लाज वाटायला हवी. ते निलज्ज आहेत. त्यांच्या मानेवर काहीतरी जोखड ठेवले आहे. आमच्याही ठेवले आहे. मात्र, सगळेच आमच्यासारखे नसतात, असे त्यांनी सांगितले.
बंड केलेल्या मंत्र्यावर कारवाई करण्यात येणार आहे. आम्ही विचारपूर्वक पावले टाकत आहोत. कोणीही सुटणार नाही. शिवसेनेशी बेईमामी करणारे कोणीही सुटणार नाहीत, असेही त्यांनी ठणकावले.
































































